48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा

48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून गढूळ आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच आता टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत प्रशासनाने पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेना धडक आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

मुंबईतील पाणीप्रश्न आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या अडलेल्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नांवर शिवसेनेची बाजू मांडली. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन सगळ्यात महत्त्वाचे विषय आज असतील तर मुंबईसाठी पाण्याचा प्रश्न आहे, अर्थात हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतोय आणि ही सगळी परिस्थिती मुंबईतही बिकट व्हायचा आज दुसरा दिवस आहे.

मुंबईतील मोठमोठ्या हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंग, चाळ सोसायटी किंवा मग रस्त्याची कामे असतील, मॉल्स आणि पायाभूत सुविधांची कामे असतील तिथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणीपुरवठा करत असते. एक आठवडाआधीच या टँकर असोसिएशनने संप पुकारला होता आणि त्यांच्या आंदोलनाचा काल पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा होता. कालही सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला आयुक्तांना विनंती केली होती की पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल तेव्हा मुंबईवर त्याचा काय परिणाम होईल? यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबई आणि मुंबईकरांना अवगत करावे की, काय त्रास सहन करावा लागणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

केंद्राशी समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढा

मुंबईतील पाणीप्रश्न हा विषय काही नवीन नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये या टँकर असोसिएशनने संप पुकारलेला आहे. दोन-तीन वेळा मी आवाहन केल्यानंतर त्यांनी सरकारशी बोलणी केली. ‘एसंशिं’चं सरकार होतं. त्या वेळच्या आश्वासनावर त्यांनी तो संप मागे घेतला होता. तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठरावीकच आहेत आणि जास्त काही मागण्या नाहीत. या मागण्यांमध्ये जास्तीत जास्त मागण्या या रास्त मागण्या आहेत. केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने भूजलाबाबत जे काही कायदे केले आहेत ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा व्यवहार्य नाहीत. असे काही कायदे त्यांनी सांगितले की, मुंबईला त्यातून सूट द्यावी.

तीन वर्षांपासून आपण पाहतो सरकारकडून आश्वासन मिळतंय, पण राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्र सरकारकडे जातोय की नाही जात? हा सगळा प्रश्न आहे. तांत्रिक बाबीत न जाता, पुकारलेला संप दोन दिवसांपासून सुरू आहे आणि आणखी किती दिवस चालेल हे माहिती नाही. कालही विनंती केली होती. आजही सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, तातडीने या असोसिएशनला आपण भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा, असेही ते म्हणाले.

‘बिकट आर्थिक परिस्थिती’ला राज्यातील ‘एसंशिं’ जबाबदार

राज्यात पाण्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आधी वाटत होतं की, या सरकारने जबरदस्त पैसा गोळा केलेला आहे. दावोसचा दौरा झाला, 15 लाख कोटी, 20 लाख कोटी, किती पाहिजेत अजून देतो… असे काही जमा केलेत. आणि असं वाटलं की, झालं, मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी उद्या-परवापर्यंत होईल. पण सत्य परिस्थिती ही आहे की, काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही. आम्हाला तिथे लढा द्यावा लागला. आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 56 टक्के त्यांच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट झाला. कॉण्ट्रक्टरच काय मुंबई पालिकेकडेही राज्य सरकारची 16 हजार कोटींची थकबाकी आहे. अशी थकबाकी असताना कॉण्ट्रक्टरना अजून मोठी-मोठी कामे दिली जाताहेत, पण स्वतःचे जे सरकारी कर्मचारी, एसटीचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. किती बिकट आर्थिक परिस्थिती या राज्यात ‘एसंशिं’ने करून ठेवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आज एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही. उद्या ही वेळ कुठल्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुंबईत पाण्याची अवस्था बिकट

गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याची समस्या आहेच. खूप ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यात अनेक पाइपलाइन डॅमेज झालेल्या आहेत. गढूळ पाणी घरांमध्ये येत आहे. कमी दाबाने पाणी येतेय. त्यात टँकर असोसिएशने पाणी देणे बंद केल्याने अनेक बिल्डिंगमध्ये पाणीच नाहीये असी परिस्थिती आदित्य ठाकरे यांनी मांडली.

एसटी प्रश्नांवरून आंदोलन करणारे कुठे गेले?

काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली, मग केंद्राने सातवा वेतन आयोग जाहीर केला. त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितले की आम्हीही हे सगळे करू, पण हे सगळे होत असताना कर्जमाफीसारखे वचन का पाळले नाही? लाडकी बहीणचे वचन पाळलेले नाही. वेगवेगळ्या योजनांचे वचन पाळलेले नाही, पण आता योजना सोडा, नवीन काही करण्याचे सोडा जे वर्षानुवर्षे पगार मिळत आलेले आहेत ते पगारही आता मिळत नाहीत. आज सवाल हाच उठतो की, जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते आणि जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना चिथावून रस्त्यावर आणत होते, आंदोलनासाठी आणत होते ते आज शांत का आहेत? गप्प का आहेत? आहेत तरी कुठे? तिथे सरकारमध्ये बसलेले आहेत. ते आज एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर का उतरत नाहीत, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

जर अशाच परिस्थितीमुळे एसटीनेदेखील संप पुकारला तर जे लोक सुट्टयांमध्ये गावी जाणारे असतील मग त्यांची काय परिस्थिती होणार? हाच इशारा सरकारला देतोय की, या दोन्ही विषयांवर शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. लाँग वीकेंड पाहून सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत. मग पाण्याचं उत्तर कोण देणार? एसटीचं उत्तर कोण देणार? सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात. मग आता मुंबईकर जो तहानलेला आहे, जर पुढच्या 48 तासांत हा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही. स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी पालिकेची होती ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पाडली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा