सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा; महापालिकेची माहिती
सोलापूर शहरात सध्या पाण्याची बोंबाबोंब सुरू असतानाच महापालिका देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा करणार आहे. पाण्याच्या शटडाऊनची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. सोलापुरात ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यावरून बोंबाबोंब सुरू आहे.
गढूळ पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच कुचननगर परिसरात मैलामिश्रित दुर्गंधयुक्त पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे शहरात आंदोलन करण्यात आले. अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच आजपासून चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांत संतापाची भावना उमटत आहेत.
महापालिकेने शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर दरम्यानची मुख्य पंपिंगलाईन नादुरुस्त होऊन गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीस बराच कालावधी लागणार असल्याने व महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीज खंडित करणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या पंपिंग स्टेशनला विद्युतपुरवठा होणार नाही. त्यामुळे चार ऐवजी पाच दिवसांआड महापालिकेकडून पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होईल, अशी माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सोलापुरात अवकाळी पाऊस
सायंकाळी ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पावसाला सुरुवात होताच वीजही गायब झाली होती. सोलापुरात सध्या उन्हाचा तडाखा बसत असून, तापमान ४२ अंश इतके झाले आहे. मंगळवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. काही कालावधीनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. यामुळे उकाड्याने व उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ झाली. रस्त्यावर पाणी साचले होते. जुळे सोलापूरसह भवानी पेठ, एसटी स्टॅण्ड परिसर, सम्राट चौकासह काही सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List