निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत! उद्धव ठाकरे यांचा भाजप, मिंध्यांवर जोरदार हल्ला
निवडणुकीपूर्वी थापा मारणारे आता हात वर करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेची आता खरी गरज आहे. कारण शब्दाला जागणारी फक्त शिवसेना आहे, असे नमूद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मिंध्यांवर जोरदार हल्ला चढवला.
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘कोकणात कुणी कसा विजय मिळवला, काय काय केले त्याच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. लोकांना कदाचित एका वेळेला कुणीतरी मूर्ख बनवू शकत असेल पण कोकणसह राज्यभरातील शेतकरी आणि सर्वसामान्य म्हणताहेत की ते फसले किंवा फसवले गेले’, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुतीचा समाचार घेतला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील निकाल सर्वांनाच अनपेक्षित होता. पण आता लवकरच कोकणचा दौरा करणार असून तळकोकणापासून संपूर्ण कोकण पादाक्रांत करू, बघू कोण मधे येते ते, कोकणचा कोपरा न कोपरा पुन्हा भगवामय झालाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे कडाडले.
स्थानिक पातळीवर काही कुरबुरी झाल्या असल्या तरी आपले घर सोडायचे नसते, शिवसेनेशी गद्दारी करणारे आणि तुमच्यात फरक आहे, कारण तुम्ही निष्ठेशी प्रामाणिक राहिलात, असे म्हणत कोकण पुन्हा भगवामय करा, असे याप्रसंगी उद्धव ठाकरे सहदेव बेटकर यांना म्हणाले. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते व पक्षाचे सचिव विनायक राऊत, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, उल्का विश्वासराव, नेहा माने, संतोष थेराडे आदी उपस्थित होते. दत्ता कदम यांचा आज वाढदिवस होता. त्यांच्या कार्याची प्रशंसा करतानाच उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
लवकरच कोकणचा दौरा करणार
16 एप्रिल रोजी नाशिकला शिवसेनेच्या शिबिरासाठी आपण जाणार आहोत. पण त्यानंतर लवकरात लवकर तळकोकणापासून वरपर्यंत संपूर्ण कोकणचा दौरा आपण करणार आहोत आणि शिवसैनिक जिथे-जिथे सांगतील तिथे जाणार, अशी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
एसंशि…लोकंच म्हणताहेत…ए चल शी….
शिवसेना एकच आहे… आणि दुसरे कोण आहेत? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी गद्दार…गद्दार…असा जोरदार प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे यांनीही ’एसंशि’ असे म्हणत एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. एसंशि…आता लोकचं म्हणताहेत की, ए चल…शी… असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेंडा ना बोडका असलेले गद्दार लोभापायी, लाभापायी शिवसेना सोडून गेले पण त्यांना ज्यांनी मोठे केले ती सर्व साधी माणसे आजही शिवसेनेसोबत आहेत, अशा शब्दांत त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आता शिवसेना वाढीसाठी कार्य करत राहणार – बेटकर
आपण 1992 मध्ये मातोश्रीवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन शिवसेनेत सक्रीय झालो होतो. मध्यंतरीच्या काळात मंडणगडमध्ये एक घटना घडली आणि मला भडकवले गेले. पण शिवसेनेवर मी कुठेही नाराज नाही आणि कधी टीकाही केली नाही. मी आज पुन्हा माझ्या घरात आलो आहे. मी साधाभोळा असलो तरी मी कधीच कुणाला कमी लेखलेले नाही. म्हणून रत्नागिरी जिल्हा माझ्या पाठिशी उभा राहिला. आता शिवसेना वाढवण्यासाठी काम करत राहीन, अशी ग्वाही यावेळी सहदेव बेटकर यांनी दिली.
रत्नागिरीतील ठेकेदारांचे राज्य संपवून टाका – संजय राऊत
महाभारतातील तीन प्रमुख पात्रे इथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण आहेत, संजय आहेच…पण सहदेव हे फार महत्त्वाचे पात्र होते. धर्मराजाच्या सर्वात जवळचा कोण असेल तर तो सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आला आहे, असे याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. सहदेवांच्या येण्याने कोकणच्या कुरुक्षेत्रावर नवीन महायुध्द सुरू झाले आहे, ते युध्द शिवसेनेला जिंकायचे आहे. अनेकांनी सांगितलेय की सहदेवांचे आता हे शेवटचे मैदान आहे, आता मैदान बदलायचे नाही. आता ठेकेदारांचे राज्य संपवून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा भगवामय करून टाका, असे संजय राऊत म्हणाले. ठकोकण असेल वा संपूर्ण महाराष्ट्र असेल, सर्व काही जागेवर आहे, फक्त हवा आहे बाहेर, त्या हवेची दिशासुद्धा बदलताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवावा, एक दौरा करावा, मग बघा एकही गद्दार औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोकणात शिवसेनेने ब्रयाच लढाया केल्या आहेत, त्यामुळे गद्दारांनी सत्तेचा धाक शिवसेनेला दाखवू नये असेही त्यांनी बजावले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List