घरात लहान मूल असेल तर किती असावं ACचं तापमान ? एम्सच्या डॉक्टरांकडून घ्या जाणून
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या कडक उकाड्या पासून थंडावा मिळावा यासाठी प्रत्येक घरांमध्ये एसी सुरू झाला आहे. कारण वाढत्या तापमानामुळे लोकं एसीचा वापर करत आहेत. पण या काळात अनेक गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्या घरात 6 महिन्यांचे लहान मूल असेल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण एसीची गार हवा लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. जर तुमच्या घरात एवढं लहान मूल असेल तर एसीचे तापमान किती असावे? कोणत्या मुलांनी एसीमध्ये झोपू नये? याबद्दल एम्सच्या डॉक्टरांनी काय सांगितले आहे. ते जाणून घेऊयात…
एम्समधील बालरोग विभागाचे डॉ. राकेश कुमार सांगतात की, जर एखादे लहान मूल घरात असेल आणि तुम्ही एसी वापरत असाल तर अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. विशेषतः एसीचे तापमान खूप कमी ठेवू नये. कमी तापमानामुळे लहान मुलांना त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. त्वचेत कोरडेपणाची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे लहान मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने एसीच्या कमी तापमानात त्यांना त्वचेशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो. यामुळे मुलाच्या शरीरात हायड्रेशनची कमतरता देखील भासू शकते. ज्यामुळे नंतर मुलांना लूज मोशन होऊ शकते. अशा परिस्थितीत, मुलांना कोणतीही समस्या येऊ नये म्हणून एसीचे तापमान नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. जर मूल एसीजवळ झोपत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
एसीचे तापमान किती असावे?
डॉ. राकेश यांच्यानुसार 6 महिन्यांपर्यंतच्या मुलासाठी घरातील एसी तापमान कधीही 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. जर तापमान यापेक्षा कमी असेल तर मुलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे मुलांमध्ये खोकला आणि सर्दी होऊ शकते. जर तुम्हाला दमा असेल तर त्याची लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये न्यूमोनियाचा धोका देखील होण्याची शक्यता असते. हे देखील लक्षात ठेवा की जर मुलाला एसी चालू केल्यानंतर खोकला येत असेल तर तो ताबडतोब बंद करा. असे न केल्यास मुलाच्या खोकल्याचा त्रास वाढू शकतो.
जर मूल एसीमध्ये झोपत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
तज्ञांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांना कधीही एसीच्या थेट संपर्कात येऊ देऊ नका. विशेषतः एसीमध्ये, मुलाचे डोके आणि पाय झाकलेले असले पाहिजेत. मुलाला थेट एसीच्या हवेच्या संपर्कात आणू नये. जर मुलाला दमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि त्वचेची अॅलर्जी असेल तर त्या लहान मुलांना एसीमध्ये झोपवू नये. असे केल्याने त्याच्या समस्या वाढू शकतात. कारण एसीच्या हवेमुळे या सर्व आजारांची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List