फुटो हे मस्तक तुटो हे शरीर..; ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर काय म्हणाले प्रवीण तरडे?
लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे हे आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. नव्या उमद्या कलाकारांना कायमच प्रोत्साहन देणारे प्रवीण तरडे यांच्यामुळे सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’चा मंच गाजणार आहे आणि कीर्तन जोरदार रंगणार आहे. येत्या शनिवारी या रिअॅलिटी शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून प्रवीण तरडे उपस्थित राहून कीर्तनकारांना प्रोत्साहन देणार आहेत. यावेळी उपस्थित कीर्तनकारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देताना महाराष्ट्राचा डीएनए हा कीर्तनाचा आहे, असं ते म्हणाले.
‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर । परी नामाचा गजर सोडू नको रे ।।’
असं सांगत प्रवीण तरडे यांनी सहभागी कीर्तनकारांचं कौतुक केलं. “हे सादरीकरण मला थक्क करणारं असून मराठी मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी मनाशी थेट जोडणारा हा रिअॅलिटी शो सोनी मराठी वाहिनीनं आणल्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, असंही प्रवीण तरडे म्हणाले.
“आजवर अनेक पुरस्कार मला मिळाले. पण या मंचावर उपस्थित राहण्याची संधी सोनी मराठी वाहिनीनं मला दिली हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारानं माझे आईवडीलही नक्कीच सुखावले असणार. आज आपल्याला समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे याचा आनंद आहे. हा रिअॅलिटी शो प्रत्येकाचा लाडका होणार आहे. हा शो अखंड चालू राहायला हवा, त्याची अनेक पर्वं व्हायला हवीत,” अशा शुभेच्छा त्यांनी या प्रसंगी दिल्या.
महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधून 108 सहभागींसह सुरु झालेला हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणत आहे. या शोचं परीक्षण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील आणि ह.भ.प. राधाताई सानप करत आहेत. ह.भ.प. राधाताई सानप यांनी त्यांच्या कीर्तनातून शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रात सामाजिक जागरूकता निर्माण करून महासांगवी संस्थानला वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. तर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी कीर्तनातून शिक्षण आणि सामाजिक जागरूकता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List