डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

डोंबिवली-ठाणे मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस धोक्याचा बनत असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये रेटारेटी झाली आणि दरवाजाजवळ उभ्या असलेला रुपेश गुजर (वय – 30) हा डोंबिवलीतील तरुण बाहेर फेकला गेला. यातच त्याचा हकनाक बळी गेला. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान सकाळी साडेआठ वाजता ही दुर्घटना घडली.

डोंबिवली सर्वधिक गर्दीचे ठिकाण आहे. मात्र प्रवासी सेवा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे. डोंबिवली ते ठाणे दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून बळी जाण्याच्या दुर्घटना वाढत आहेत. यावर उपाय म्हणून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही. याच गर्दीमुळे आज रुपेशचा जीव गेला.

रुपेश डोंबिवलीतील तुकारामनगर येथे राहतो. मुंबईला कामावर जाण्यासाठी त्याने सकाळी डोंबिवलीहून लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीच्या रेट्यामुळे तो दिवा-कोपर दरम्यान लोकलमधून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे कुंभकर्णी झोपेत

मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. मात्र दररोज होणाऱ्या गर्दीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. कुंभकर्णी झोपेत असलेले रेल्वे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? गर्दी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केव्हा होणार? असे संतप्त प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement