शुभांशू शुक्ला अंतराळात जाण्यासाठी सज्ज, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे हिंदुस्थानी
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या साथीदारांसह नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या. त्यानंतर आता हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात ऑक्सिओम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाण्याच्या तयारीत आहेत. या मोहिमेत तीन देशांचे चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने याची माहिती दिली.
नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हिंदुस्थानच्या हवाई दलात अधिकारी आहेत. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे हिंदुस्थानी ठरणार आहेत. याआधी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.
हिंदुस्थानच्या हवाई दलात पायलट असलेले शुभांशू शुक्ला नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील संघात सामील होतील. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर असणार आहेत. त्याच्यासोबत पोलंडचे स्लोज उझनान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे दोन मिशन तज्ञ असणार आहेत.
शुभांशू यांनी 2019 मध्ये रशियाच्या गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळयात्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गगनयान मिशनसाठी त्यांची इस्रोकडून निवड झाली.
मोहिमेचे उद्दिष्ट
ऑक्सिओम मिशन 4 ही एक खासगी अंतराळ उड्डाण मोहीम आहे. हे अभियान अमेरिकेची खासगी अंतराळ कंपनी ऑक्सिओम स्पेस आणि नासा यांच्या सहकार्याने राबवले जात आहे. हे अभियान ऑक्सिओम स्पेसच्या खासगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक (ऑक्सिओम स्टेशन) स्थापन करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. अॅक्स-4 चा मुख्य उद्देश अंतराळात वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे आहे. ऑक्सिओम स्पेसचे हे चौथे मिशन आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List