Disha Salian: त्या महिलेला पैसे का दिले? अखेर दिशा सालियानच्या वडिलांचं स्पष्टीकरण
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांचा जबाब काय होता, याबद्दलची माहिती समोर आली आहे. सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाची एक्सक्लुसिव्ह माहिती ‘टीव्ही ९ मराठी’ला मिळाली आहे. आधी मालवणी पोलीस आणि नंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडेही सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सतीश सालियान यांनी जबाबात म्हटलं होतं की त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला काही गैरसमज झाले होते. दिशाच्या वडिलांनी जबाबात हे मान्य केलं होतं की ते त्यांच्या संपर्कातल्या महिलेला पैसे देत होते.
सतीश सालियान आणि त्यांच्या एका मित्राने मिळून लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र मधल्या काळात त्या मित्राचं निधन झालं. लॉकडाऊनमुळे दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण असल्याने तिला किराणा खर्चासाठी पैसे देत होतो, असं सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलंय. मात्र यावरून दिशा आणि त्यांच्यात वाद होत असल्याने त्यांनी स्वतःच्या खात्यातून पैसे देणं बंदही केलं होतं. दिशाने वडील सतीश सालियान यांचे व्हॉट्सअप मेसेज स्वतःच्या लॅपटॉपवर वळते करून घेतल्याने ते अजूनही पैसे देत असल्याचं दिशाला समजलं होतं, असा सतीश सालियान यांचा जबाब होता.
दिशाच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी नेमकं काय झालं होतं?
दिशाचे वडील सतीश सालियान यांनी त्यांच्या संपर्कात असणाऱ्या महिलेला मित्राच्या माध्यमातून तीन हजार रुपये दिले होते. मित्राकडे कॅश देऊन हे पैसे त्यांनी त्या महिलेला पाठवायला सांगितलं होतं, असं सतीश सालियान यांनी जबाबात म्हटलंय. मित्राने पैसे पाठवून त्याचा स्क्रीनशॉट सतीश सालियान यांना पाठवला होता. मात्र वडिलांचं व्हॉट्सअप दिशाच्या लॅपटॉपमध्ये सुरू असल्याने तिने ते पाहिलं होतं, अशी माहिती खुद्द सतीश सालियान यांनी जबाबात दिली होती.
2 जून 2020 रोजी दिशा आणि तिचे वडील सतीश सालियान यांच्यात यावरून भांडण झालं होतं. कोव्हिड काळात पैशांची कमतरता असतानाही वडिलांच्या या वागण्यावर दिशा नाराज होती अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान सतीश सालियान यांनी दिशाची आत्महत्या नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशाच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डिनो मोर्या यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List