‘…मग गोवाहटीचा इतिहास बदलायचा का?’ कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा खोचक टोला
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली होती, त्यानंतर आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साठ ते सत्तर शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात आकरा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलं, त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यासाठी संविधान वाचायला पाहिजे, संविधान समजून घ्यायला पाहिजे. अभिव्यक्ती स्वतंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आधीचे नेते तुरुंगात गेले होते. इंदिरा गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत, यासाठी तुमचे नेते तुरुंगात गेले होते. गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बेईमानांना बेईमान म्हणायचं नाही का? रिक्षावाल्यांना रिक्षावाला म्हणायचं नाही का? जे गद्दार गोवाहटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का? एखाद्या कलाकाराने जर कलेच्या माध्यमातून हे मांडलं असेल तर चिंता वाटण्याचं काही कारण नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबनात्मक टीकेनंतर आता कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. कुणाल कामराचा सीडीआर तपासला जाणार आहे. त्याचे सर्व कॉल देखील तपासले जाणार आहे. कुणाल कामरा कोणाच्या सांगण्यावरून बोलला, त्याचा बोलवता धनी कोण आहे? हे शोधून काढलं जाईल असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. शिवसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने माफी मागावी, अन्यथा त्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे कुणाल कामराने लोकभावना मांडल्या, त्यामुळे आपण त्याच्या पाठिशी उभे आहोत असं वक्तव्य या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List