मंत्री जयकुमार गोरे प्रकरण; पीडित महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात एक कोटीची खंडणी स्वीकारताना अटक केलेल्या पीडित महिलेला आज दुपारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता, तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या खंडणी प्रकरणात मिंधे गटाचा माण तालुक्यातील पदाधिकारी अनिल सुभेदार यालाही अटक करण्यात आली असून, त्यालाही 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पीडित महिलेने हे प्रकरण मिटविण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागत असल्याची तक्रार विराज शिंदे यांनी केली होती. त्यापैकी एक कोटीची कॅश स्वीकारताना या महिलेला शुक्रवारी सकाळी साताऱ्यातील वकिलाच्या कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज सातारा जिल्हा न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पठाण यांच्यासमोर महिलेला हजर केले.
मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यालाही अटक
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात शिंदे गटाचा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार याला दहिवडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार याचा सहभाग असल्याचा आरोप असून, दहिवडी येथील न्यायालयात अनिल सुभेदार याला पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने त्याला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List