“तुरुंगात आर्यन खानला.. “; एजाज खानचा मोठा खुलासा
अभिनेता एजाज खान अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचं नाव ड्रग्ज प्रकरणातही समोर आलं होतं. ज्यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात होता, त्याचवेळी एजाजसुद्धा वेगळ्या बॅरेकमध्ये कैद होता. इतकंच नव्हे तर त्यावेळी इंडस्ट्रीतील इतरही हाय प्रोफाइल लोग तुरुंगात होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एजाजने त्याचा तुरुंगातील अनुभव सांगितला. तुरुंगातील कठीण काळात आर्यन खानने त्याची मदत केल्याचा खुलासा एजाजने केला.
एजाज खानने मुलाखतीत सांगितलं की शाहरुख खानचा मुलगा आर्यनही त्याच तुरुंगात होता. या तुरुंगात तीन हजारहून अधिक कैदी होते आणि त्यामध्ये आर्यन असुरक्षित होता. “आर्यनसुद्धा त्यावेळी तुरुंगात होता. मी त्याला मदत केली होती. मी त्याला पाणी आणि सिगारेट दिलं होतं. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही आणखी काय करू शकता? आणि हो मी त्याला गुंड आणि माफियांपासूनही वाचवलं होतं. त्याला एका सामान्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या जीवाला धोका असू शकला असता”, असं एजाज म्हणाला.
कोरोना काळात एजाज हा ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. त्यावेळी पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासुद्धा तुरुंगात होता. राजबद्दल बोलताना एजाज म्हणाला, “राज कुंद्रा मला दररोज मेसेज करायचा. त्याच्यावर कडक देखरेख होती. जेव्हा राज तुरुंगात आला तेव्हा मी तिथे सात महिने घालवले होते. त्याने मला मदत केली नव्हती, उलट मीच त्याची मदत केली. मग ते बिस्किट असो, बिस्लरीचं पाणी असो किंवा सिगारेट असो. तुरुंगात त्या सर्व गोष्टींची व्यवस्था करणं इतकं सोपं नाही. त्याने मला पाणी मागितलं होतं. तिथे फक्त सामान्य पाणी उपलब्ध होतं, बिस्लरीचं नाही. ते पाणी पिऊन आजारी पडू या भीतीने त्याने ते प्यायलं नाही.”
आर्यन खान जवळपास दीड वर्षापूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता. मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने ही कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मैत्रीण मुनमुन दामेचा या तिघांसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. या कारवाईनंतर आर्यन जवळपास वीस दिवसांहून अधिक दिवस तुरुंगात होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List