विरोधी पक्षाचा कामकाजावर बहिष्कार; गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
महाविकास आघाडीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात 5 मार्चला नियमाप्रामाणे प्रस्ताव दिला होता. मात्र सभापतींनी मंगळवारी तो फेटाळला. आज कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला. तसेच विरोधी पक्षनेत्याला आपली भूमिका मांडू दिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. तसेच याचा निषेध म्हणून गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहे. तसेच उपसभापती डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती दानवे यांनी दिली.
एकप्रकारे सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज चढला आहे. त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू न देता रेटून प्रस्ताव नेला, त्याला आम्ही विरोध केला. त्यावर आम्ही अर्धा तास घोषणा दिल्या. विरोधी पक्षाला बोलू न देणे हे लोकशाहीला बाधक आहे. लोकशाहीच्या संस्कृती व परंपरेला छेद देणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले. तसेच डायसवर तालिका सभापती यांना बसवून या प्रकरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला. यात संबंधित अधिकारी देखील दोषी आहेत. त्यांनी नियमानुसार प्रस्ताव आणायला हवा होता. सत्ताधारीच कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List