“‘छावा’ पाहिला तर त्यात..”; औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना काय म्हणाले एकनाथ शिंदे?
छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केलेल्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. यावेळी त्यांनी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचंही उदाहरण दिलं. “गेल्या काही दिवसांपासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे, कोणी सुरू केलं, कशासाठी सुरू केलं.. याच्या मुळाशी तर सरकार जाईलच. परंतु औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगला प्रशासक होता, अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती. त्यावेळीही मी अबू आझमींना मी समज दिली होती,” असं ते म्हणाले.
‘छावा’चा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वीत छळ करून, त्या औरंगजेबाने हालहाल करून त्यांची हत्या केली.. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शंभूराजांचा इतिहास वाचला आणि आता ‘छावा’ चित्रपट पाहिला तर खरी वस्तुस्थिती काय आहे, ती त्यात दाखवण्यात आली आहे. शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस अनन्वीत छळ केला. त्यांची जीभ छाटली, त्यांच्या अंगावरची सालटी काढली, त्यावर गरम तेल टाकलं, पाणी टाकलं, मीठ टाकलं, डोळ्यांमध्ये गरम शिळ्या टाकल्या.. असा छळ केलेल्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का, हा माझा सवाल आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं म्हणजे हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्यासारखा आहे. खऱ्या अर्थाने हा देशद्रोहच आहे.”
“हा औरंग्या आपल्याकडे आला कशासाठी होता? महाराष्ट्राचा घास घ्यायला.. त्याने आपली मंदिरं उद्ध्वस्त केली, आयाबहिणींची अब्रू लुटली. शंभूराजे सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले. हा सगळा इतिहास आहे. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही. एक सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही, करणार नाही. अशा प्रकारची त्याची क्रूरता होती. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे,” असं वक्तव्य त्यांनी विधानसभेत केलं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List