‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांचा रोख काय?
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.
लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
जयंत पाटील यांची राजकीय फटकेबाजी
भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे. राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते.तसेच हिंदुत्व समोर असते. मग तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल.
टेंडरवर जयंत पाटील यांची टीका
जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले, कोणाची मागणी नसताना नवीन मार्ग तयार केले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण सरकार नवे, नवे रस्ते करण्यात का इंट्रेस्ट घेत हे कळत नाही. मोठ मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा, असा प्रकार सुरु आहे. पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार जमिनीचे पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर पाहते. परंतु आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नको, असे शेतकरी सांगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List