मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. मात्र त्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या. तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागाच मिळाल्या, त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. विशेत: शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश होत आहे. याचा सर्वात मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
तर आता दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद सोनवणे हे जुन्नरचे अपक्ष आमदार आहेत. ते 28 फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली. शरद सोनवणे यांच्या या निर्णयामुळे जुन्नर मतदारसंघात अजित पवार आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. या अटितटिच्या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके याचा पराभव केला. दरम्यान शरद सोनवणे यांनी महायुतीत असताना राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं शिरुर मतदारसंघात शिवसेनेचं नेतृत्व नव्हतं. आता शरद सोनवने हे आढळराव पाटलांची जागा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List