नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा अॅड. गीतेश बनकर यांनी केला आहे. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. सीआयडीने त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर केले आहे. मागील महिन्यात तो नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा होती. आज बुधवारी सकाळपासून पुन्हा ही चर्चा रंगली आहे. गंगापूर रोडवरील विसे चौकात सुयोजित गार्डनच्या दत्त मंदिराजवळ तो एका मोटारसायकलवर त्याच्या साथीदाराबरोबर मागे बसलेला दिसल्याचा दावा अॅड. गीतेश बनकर यांनी केला आहे. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट, तर साथीदाराने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास हे दोघे मोटारसायकलने मखमलाबादच्या दिशेने गेले.
कृष्णाने तोंडावरील मास्क हटविल्यानंतर त्याला ओळखले, काही मिनिटातच मी गंगापूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली, असे गीतेश बनकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. नाशिक पोलिसांनी या माहितीवरून कृष्णा आंधळेचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही तपासणीबरोबरच शोधासाठी विशेष पथके पाठविण्यात आली. शहरासह संशयित ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस पथक शोध घेत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List