Women’s Day 2025 – ‘ती’च्या नेतृत्वात उद्योगांचा डोलारा
आजच्या महिलांनी शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रापासून व्यवसाय, उद्योगापर्यंत स्वतःचा ठसा उमटवला आहे. अनेक अडचणींना तोंड देत उद्यमशील महिला समाजाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांनी अनेक उद्योगांचा डोलारा सांभाळला आहे. अशाच काही कर्तृत्ववान बिझनेस वुमेनच्या कार्यांचा धांडोळा घेऊ या.
रोशनी नाडर मल्होत्रा
एचसीएल टेक्नोलॉजीजच्या संचालक रोशनी नाडर मल्होत्रा या देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील आहेत. रोशनी या एचसीएल टेक्नोलॉजीजचे संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या आहेत. त्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय एचसीएल टेक्नोलॉजी आणि त्याच्या सीएसआर बोर्ड कमिटीच्या प्रमुख आहेत.
चैताली दास
चैताली दास या ‘ज्युट क्वीन’ म्हणून ओळखल्या जातात. ‘रुट टू ज्यूट’ या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची ज्यूट उत्पादने जगभरात पोहोचली आहेत. रक्षक फाऊंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. आसाममधील तुरुंगातील कैद्यांना त्यांनी ज्यूट उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
ईशा अंबानी
ईशा अंबानी या बिझनेस लीडर आहेत. रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड, रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड, जियो फायनान्शिअल सर्विसेज लिमिटेड, रिलायन्स फाऊंडेशन, रियालन्स फाऊंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आणि धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बोर्ड सदस्य म्हणून कार्यरत आहेत. रिलायन्स रिटलेच्या विस्तारावर त्यांचा भर आहे.
फाल्गुनी नायर
‘नायका’च्या सीईओ फाल्गुनी नायर या फोर्ब्ज इंडिया रिच 2022 च्या यादीत 4 अब्ज डॉलरहून अधिक संपत्तीसह 44 व्या स्थानावर होत्या. आयआयएम, अहमदाबाद येथून पदवी घेतल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी 2012 साली सौंदर्य, फॅशन आणि आरोग्यसंबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘नायका’ ब्रँडचा शुभारंभ केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘नायका’ हा ब्रँड घरोघरी पोहोचला.
देविता सराफ
मुंबईकर असलेल्या देविता सराफ या आघाडीच्या व्हीयू टेलिव्हीजनच्या संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ आहेत. अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी बिझनेस सुरू केला. वडील आधीपासूनच बिझनेसमध्ये होते. त्याचा त्यांना फायदा मिळाला. त्या आजघडीला 3 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याच्या मालकीण आहेत. देविता यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले.
गझल अलघ
‘मामाअर्थ’ या पर्सनल केयर ब्रँडच्या संस्थापिका गझल अलघ या लाखो युवा उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. मुलं आणि मातांसाठी सुरक्षित आणि हर्बल प्रोडक्ट तयार करणे हे मामाअर्थ ब्रँडची मुख्य ओळख. नैसर्गिक उत्पादनांमुळे ‘मामाअर्थ’ ब्रँडने अल्पावधीत मोठे यश मिळवले आहे. देशातील जलदगतीने विस्तारलेल्या स्टार्टअपमध्ये गझल अलघ यांच्या ब्रँडचे नाव घेतले जाते.
राधिका गुप्ता
राधिका गुप्ता म्हणजे मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रांतील मोठे नाव. राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि सीईओ आहेत. राधिका यांच्या नेतृत्वात कंपनीने म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली. त्यांचे बिझनेस मॉडेल गुंतवणूकदारांना सोपा आणि फायदेशीर पर्याय प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत करते.
कनिका टेकरीवाल
कनिका टेकरीवालची कहाणी प्रेरणादायी आहे. कनिका या जेट सेट गोच्या सीईओ आणि संस्थापक आहेत. जेट सेट गो ही दिल्लीस्थित खासगी जेट सेवा कंपनी आहे. कंपनी ही एक प्लेन एग्रीगेटर आहे, जी लोकांना खासगी जेट आणि हेलिकॉप्टर भाड्याने देते. कनिकाला हिंदुस्थान सरकारकडून ई-कॉमर्ससाठी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारही मिळाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List