Sanjay Raut : जयकुमार गोरेंसारखा विकृत मंत्री… संजय राऊतांचा तो गंभीर आरोप, म्हणाले अमित शाहांना पत्र लिहणार
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे छायाचित्र समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विकेट पडली. तर दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य आज कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यातच महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महायुतीमधील दोन मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची जमीन हडपल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत महायुतीला सोलपटून काढले.
जयकुमार गोरे विकृत मंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी आज प्रसार माध्यमांसमोर केला. ते एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा राऊतांनी केला. दरम्यान या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा पिसले पाहिजे
संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे नवीन पात्र तुमच्या मंत्रिमंडळात समोर आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे, असा सल्ला राऊत द्यायला विसरले नाहीत. त्यांनी सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सर्व रत्नं, 14 आहेत की जास्त, ती त्यांनी तपासली पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याविषयी जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, असे ते म्हणाले.
महिला आयोग कुठंय?
या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे ते म्हणाले. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय अशी विचारणा त्यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List