‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या असा आरोप त्यांनी केला आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
मी उद्धव ठाकरे यांना इतक्या वर्षापासून जवळून पाहत आहे, उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीचा जो आमचा सर्वांचा अभ्यास आहे, ते पाहिल्यानंतर त्यात काही विशेष बाब आहे असे मला वाटत नाही. नेत्यांचं मंत्रिपद काढून घेतलं, बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री, दिवाकर रावते यांचंही मंत्रिपद काढून घेतलं. राऊत साहेब आपला अभ्यास दांडगा आहे, अपक्षांना मंत्रिपद देण्यात आलं, त्यांचा पक्ष वाढिशी काहीही संबंध नव्हता. त्याच्यामागे काय गौडबंगला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तानाजी सावंताना फोन लावून विचारा, त्यांना मंत्री बनण्यासाठी काय काय करावं लागलं ते विचारा? म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल. कशाला नीलम ताईंना बोलता, असा हल्लाबोल कदम यांनी राऊतांवर केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अशोक पाटील जे आता आमदार झाले, मागच्यावेळी ते सिटिंग आमदार असतानाही त्यांना तिकीट दिलं नाही. अशोक पाटील यांचा एबी फॉर्म काढून घेण्यासाठी समोरच्याकडून किती मिठाई घेतली याचा अभ्यास आपण करून घ्या, आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो आहोत, तुमच्यापासून काही लपून ठेवलं नाही. तुम्ही नीलम गोऱ्हेंबद्दल जे बोलत आहात ते तुम्हाला शोभत नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.
असा एकही दिवस जात नाही, की ते एकनाथ शिंदेंविरोधात बोलत नाहीत. मुघलांचे घोडे पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांना पाण्यात संताजी -धनाजी दिसायचे, तशी राऊत यांची अवस्था झाली आहे. राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे, पंतप्रधान आणि शिवसेना हे पाण्यात दिसतात त्याला काही औषध नाही, असा खोचक टोला यावेळी कदम यांनी लगावला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List