महायुतीत महागोंधळ! फिक्सरच्या नावांना मान्यता देणार नाही! कोकाटेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचा सिक्सर
राज्याच्या महायुती सरकारमध्ये महागोंधळ सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पीएस आणि ओएसडीच्या नेमणुकीवरून अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना फडणवीस यांनी चांगलंच सुनावलं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, ”आम्ही मोठ्या संख्येने निवडून आलो. मात्र निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) दम दिला की, आता तुमच्या कोणाच्याही जाण्यामुळे सरकारवर परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी राहाल. त्यांनी आम्हाला 100 दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी हे देखील मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काही राहिलं नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
कोकाटे यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”माणिकराव कोकाटे यांना माहित नसेल की, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतात. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून आणि चुकीच्या कामात पुढे आली आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही.”
ते म्हणाले, ”आतापर्यत माझ्याकडे 125 च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केली आहेत. उर्वरीत नावं मी क्लिअर केली नाही. कारण कुठले आरोप त्यांच्यावर आहे. कुठली चौकशी त्यांच्यावर सुरू आहे किंवा मंत्रालयात त्यांच्याबद्दल मत हे फिक्सरचं आहे. कोणीही नाराज झालं तरीही, मी अशांना मान्यता देणार नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List