ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, त्यातच घाण करून गेल्या; संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंना फटकारले
दिल्लीतील साहित्य संमेलनात अखरेच्या दिवशी ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखतपर कार्यक्रमात मिंधे गटाच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नमकहरामी करत शिवसेनबद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य केले. त्याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हे व साहित्य संमेलनाच्या आयोजकांना फटकारले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
”महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी तुम्ही देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन भरवलं का? मराठी साहित्य महामंडळ जे आहे ते खंडण्या घेऊन संमेलन भरवतय. दोन कोटी सरकारनं दिले तर त्यातले 25 लाख खंडणी म्हणून बाजूला काढायचे. कार्यक्रम ही महामंडळं भरवतात आणि आयोजक सतरंज्या उचलायला असतात. कार्यक्रम पत्रिकेवरील कार्यक्रम उषा तांबेंनी ठरवले. त्यांचे पती हे महाराष्ट्राच्या पीडब्ल्यू डी खात्यावर होते. सर्वात भ्रष्ट खातं आहे ते, असं संजय राऊत म्हणाले.
”निलम गोऱ्हे याचं कालचं वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. ज्या घरात खाल्ल, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत. ज्यांच्यामुळे आमदार झालात. तिथेच घाण करून गेल्या. सुरुवातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, हे कोण ध्यान आणलंय आपल्या पक्षात. तरी काही लोकांच्या मर्जीखातर त्या पक्षात आल्या व चार वेळा आमदार झाल्या. जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय हे जर समजून घ्यायचं असेल तर पुणे महानगरपालिकेत आमचे गटनेते होते अशोक हरनळ म्हणून त्यांच्याकडून धमक्या देऊन पुण्याचं प्लानिंग सुरू होतं. तेव्हा कुणा कुणाच्या नावावर या बाईंनी कोट्यवधी रुपये गोळा केले ते समजेल. नाशिकचे माजी महापौर व आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडेंना शिवसेनेची उमेदवारी देण्यासाठी किती पैसे घेतले ते पांडेंनाच विचारा. ते प्रकरण काय झालं ते आम्हाला माहित आहे. विनायक पांडेंनी या बाईंकडून कसे पैसे वसूल केले ते आम्हाला माहित आहे. तुम्ही कुणावर थुंकताय, मातोश्रीवर? काय तुमचं कर्तृत्व होतं. तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलेलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नव्हते. तुम्ही पक्ष सोडून गेलात पण एक संस्कार संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो जे काही तुमची कारणं असतील. पण गेल्यानंतर तुम्ही मातोश्रीबाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत अशी विधानं करतात. त्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं. उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी निलम गोऱ्हे यांना सुनावलं. यावेळी पत्रकाराने हक्कभंगाची कारवाई होऊ शकते असे सांगितल्यावर संजय राऊत म्हणाले की, ”माझ्यावर दहा हक्कभंग आणा. मी निलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. उपसभापतींवर बोललो नाही. महाराष्ट्राने या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई आहे, काय कमी केलं होतं त्यांना द्यायला. हक्कभंगाच्या धमक्या मला देऊ नका, आम्ही तुरुंगात जाऊन आलो, ईडी सीबीआय झालं, हक्कभंग झाले आहेत, त्यामुळे आम्हाला या धमक्या देऊ नका., असं त्यांनी सुनावलं.
”या प्रकाराची मराठी साहित्य महामंडळाने माफी मागायला पाहिजे. उषा तांबे या कोण बाई मला माहित नाही. त्यांचं साहित्यातलं काय योगदान ते माहित नाही. ही अशी लोकं साहित्य समेलनं भरवणार आणि मराठीचा उद्घोष करणार. काल निलम गोऱ्हे म्हणाल्या मी उषा तांबेंना पन्नास लाख देऊन माझा कार्यक्रम लावला. जर ही बाई मर्सिडिज देऊ शकते असं म्हणते तर ही पन्नास लाखही देऊ शकते. लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात ते विचारा. प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावर संबंधितांना बोलावून डिल करायला किती पैसे घेतात? माझ्याकडे सगळी पुराव्यासहित माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले,
शरद पवारांनी निषेध करायला हवा
”अखिल भारतीय साहित्य संमेलनच या राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहे. सरहदचे संजय नहार यांची ही मूळ कल्पना होती. नहार यांना मी काल कॉल केला. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केल्याचा सांगितले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ असं काहीतरी दुकान आहे त्या दुकानदारांचा आहे. माननीय शरद पवार देखील या चिखलफेकीची जबाबदारी झिडकारू शकत नाही. ते ज्येष्ठ आहेत, ते पालक आहेत, या कार्यक्रमाचे ते स्वागताध्यक्ष होते, ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले व त्यात जी राजकीय चिखलफेक झाली, त्यासाठी ते देखील तितकेच जबाबदार आहेत. शरद पवार यावर गप्प कसे राहू शकतात. त्यांच्यावर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो ना. त्यांनी या घटनेचा निषेध करायला हवा, असं संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List