खाऊगली- गोमंतकीय मेजवानी

खाऊगली- गोमंतकीय मेजवानी

>> संजीव साबडे

मुंबईमधील खाद्यसंस्कृतीवर इराणी, ख्रिस्ती समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. या भागातील ख्रिश्चन वस्तीमुळे या भागात गोमंतकीय संस्कृती रुजली. पोर्तुगीजांची सत्ता असलेल्या गोव्यातून आलेल्या या खाद्यसंस्कृतीवर पोर्तुगीजांचा प्रभाव होता. ही खाद्यसंस्कृती दर्शवणाऱया रेस्टॉरंट्सची ही सैर.

ब्रिटिश जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्या सर्वांचं वास्तव्य दक्षिण मुंबईत होतं. त्यांनी तिथेच किल्ला बांधला, तिथलाच समुद्र हटवून एस्प्लेनेड भाग तयार केला. एस्प्लनेड म्हणजे आजचं ओव्हल, क्रॉस आणि आझाद मैदान असलेला भाग. समुद्रकिनाऱयाचा हा भाग संपूर्ण रिकामा होता आणि ब्रिटिश व नेटिव्ह तिथे फिरायला जात. या ब्रिटिशांच्या खाण्यासाठे कुलाबा, फोर्ट आणि मरीन लाइन्स भागात इराणी व ख्रिस्ती लोकांची रेस्टॉरंट्स स्रू झाली. क्रॉस मैदानात पूर्वी चर्च होतं. ते हटवलं आणि तिथे क्रॉस उभा केला. आता ते चर्च मरीन लाइन्सजवळ आहे. मग त्याच भागात ख्रिश्चन लोकांची वस्ती होऊ लागली. त्यातले बरेच जण गोव्याचे होते. पोर्तुगीजांची सत्ता असलेल्या गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीवर पोर्तुगीजांचा प्रभाव होता. पण त्यांच्यासाठीची रेस्टॉरंट्स तिथेच आहेत. गिरगांवातून प्रिन्सेस स्ट्रीटकडे आलं की ती दिसू लागतात.

गिरगावात मराठी मंडळींची मांसाहारी रेस्टॉरंट्स, तर मरीन लाइन्स व पुढे ख्रिश्चन मंडळींची. तिथे कधी जाणं झालं नसेल. पण ती चव समजून उमजून घेतली पाहिजे. मटण, चिकन, मासे खाणारी मंडळी बीफ मात्र खात नाहीत. इतकंच नव्हे, तर बीफ मिळतं, अशा ठिकाणी जेवायला जायचंही टाळतात. सर्व स्वयंपाकासाठी तीच ती भांडी वापरतात, अशी पूर्वी शक्यता व भीती व्यक्त व्हायची. पूर्वी असेलही तसं पण आता मात्र सर्वच रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी, फिश, मटण व चिकनची वेगळी भांडी असतात. तसंच गोवन ख्रिश्चनांच्या रेस्टॉरंटमध्ये बीफची भांडी वेगळी असतात. तिथे बीफऐवजी चिकनचे सोर्पोतेल वा विंदालूही सहज मिळू शकते. त्यांच्याकडील फिश व मटण कटलेट, चिकन सागुती, आंबट व तिखट असल्याने आंबोट टिक (आंबोटिक) करी आणि रचाडो, स्टफ स्क्विड हे प्रकार मस्त असतात. काही ठिकाणी भेजा फ्राय व पावही मिळतो.

प्रिन्सेस स्ट्रीटच्या अगदी जवळच म्हणजे धसवाडीत आहे सी. डिसोझा रेस्टॉरंट. अतिशय जुनं. तिथे मासे, मटण, चिकन व पोर्कपासूनचे ऑथेंटिक गोवन खाद्यपदार्थ मिळतात. चिकन सागुती, पोर्क विंदालू, पोर्क सोर्पोतेल, पोर्क सॉसेजेस, चिकन कॅफेरेल, गोवन सॉसेजेस पुलाव, किंग फिश रचाडो, स्टफ स्क्विड, सारखी आंबोट टिक असे असंख्य खास गोंयचे पदार्थ खायचे असतील तर तिथे जायलाच हवं. ज्यांना पोर्क खायचं नसेल त्यांच्यासाठी मटण, चिकन, फिशचे सारे पदार्थ गोव्याच्या मसाल्यात तिथे नक्की मिळू शकतात.

प्रिन्सेस स्ट्रीट क्रॉस करून मेट्रोकडे जाताना डावीकडे लागते जांभूळ वाडी. त्या वाडीत शिरताच उजव्या हाताच्या इमारतीत सुरुवातीला आहे कॅसल रेस्टॉरंट. बाहेरून ते फार चकचकीत दिसत नाही. पण तिथले पदार्थ खाऊन समाधानाची ढेकर देता येते. तेथील रचाडो बांगडा, प्रॉन्स चॉप, फिश कटलेट, पोर्क सोर्पोतेल व विंदालू, लेप (सोल) फ्राय व करी, आंबो टिक करी व भात, शिंपी सुका, चिकन विंदालू, खेकडा करी, हलवा फ्राय, खेकडा गस्सी, कोरी रोटी, नीर डोसा व चिकन असे खूप प्रकार मिळतात. मालक बहुदा मंगलोरचा असल्याने रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये काही मंगलोरी पदार्थही आहेत. अर्थात दोन्ही खाद्यसंस्कृतीमध्ये बरंच साम्य आहे.

त्या गल्लीतून बाहेर आलं की धोबी तलावच्या गल्लीत स्नो फ्लेक रेस्टॉरंट आहे. तिथे जेवणात फिश, चिकन, मटण व पोर्कचे अनेक खाद्यपदार्थ आहेत. शिवाय तिथे बीफ स्टेक, बीफ पोटॅटो चॉप्स, सॉसेजेस चिली फ्राय, पोर्क सोर्पोतेल वगैरे आहेत. जेवणानंतर कॅरमल कस्टर्डही मिळतं. जुन्या इराणी रेस्टॉरंटसारखी येथील आतील रचना आहे. इथेही गोल टेबल आणि बाजूने लाकडी काळ्या खुर्च्या आहेत.

मरीन लाइन्सचा परिसर सोडून फोर्ट पार करून अपोलो बंदर म्हणजेच कुलाब्याला गेलो की तिथे न्यू मार्टिन नावाचं अगदी छोटं, पण मस्त रेस्टॉरंट आहे. हे पूर्वी ब्रिटिश व त्यांचे सोजीर (सोल्जर) यांचं आवडतं ठिकाण. तेथील मेनूही मर्यादित आहे. पण जेवण अतिशय उत्तम. तिथे सोमवार ते शनिवार जेवणाचे प्रकार ठरलेले असतात. प्रॉन्स, चिकन, मटण, सॉसेजेस पुलाव साधारणपणे रोज मिळतो. तेथील चिकन लिव्हर फ्राय आणि चिकन विंदालू भन्नाट. विंदालू व सोर्पोतेल, सॉसेजेस जिथे नाहीत, त्यांना आम्ही गोवन रेस्टॉरंट मानतच नाही, असं एका मित्राने बोलूनच दाखवलं. न्यू मार्टिन रेस्टॉरंट रविवारी मात्र बंद असतं.

कुलाब्याच्याच आर्थर बंदर रोडवर असंच एक जुनं ठिकाण आहे गॅबल्स रेस्टॉरंट. बदलत्या काळानुसार तिथे पास्ता व पिझ्झा आला असला तरी तिथली गोवन फिश करी, चिकन विंदालू, ब्रेड व सॉसेजेस, चिकन व फिश पुलाव व कॅरमल कस्टर्ड अप्रतिम. त्यांची बेकरीही असल्याने अनेक बेक पदार्थ तिथे ताजे मिळतात.

आता काही गोव्याचीच, पण गोवन नव्हे तर गोमांतक रेस्टॉरंट्स. अशा ठिकाणी पोर्क, सॉसेजेस, कॅरमल कस्टर्ड वगैरे काहीच नसतं. पण जेवण मस्त असतं. फोर्टच्या पेरीन नरिमन स्ट्रीटवर संदीप गोमांतक नावाचं अतिशय साधं, जुनं व उत्तम जेवण असलेलं रेस्टॉरंट आहे. तिथे मासे व चिकनची थाळी आहे. शिवाय बांगडा, बोंबील, पापलेट फ्राय, सुकं चिकन, कोंबडी वडे असे अनेक प्रकार आहेत. अगदी घरगुती पद्धतीचं इथलं जेवण सर्वांनाच आवडतं. अनेक खासगी कार्यालयातील कोंकणी व मराठी लोकांचं हे जेवणाचं प्रेमाचं ठिकाण. असंच आणखी एक फोर्टमधां ठिकाण म्हणजे प्रदीप गोमांतक! बोरा बाजारला लागून असलेल्या रुस्तम सिधवा मार्गावर आणि फायर ब्रिगेडपाशी असलेलं प्रदीप गोमांतकही खूप जुनं. तिथेही कोंबडी वडे, सुकं चिकन, वेगवेगळे तळलेले व तवा फ्राय मासे, सोलकढी असं साधंच पण अतिशय उत्तम जेवण मिळतं. गोमंतकीय खाणं नको असेल तर तिथे जवळच आयडियल कॉर्नर आहे. तसंच पुढे नगीनदास मास्टर रोडवर  कॅफे मिलिटरी आहे. फोर्टमधील ही दोन्ही जुनी रेस्टॉरंट्स पारशी खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहेत. इथे मटण धनसाक व चिकन फरचा तसंच कटलेट व पॅटिस छान मिळतात.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..