Vasai News हात-पाय बांधले, चावा घेतला, नंतर गळा घोटला… मुलगी गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या
मुलगी गर्भवती राहिल्याने आईनेच तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत समोर आली आहे. ही हत्या करताना लहान बहिणीनेही आपल्या आईची साथ दिल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे पाप लपवण्यासाठी मुलीने गळफास घेतल्याचा कांगावा केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला असून आरोपी मायलेकींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ममता दुबे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
अस्मिता दुबे (20) ही तरुणी नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील फेजमधील जय विजय नगरी या इमारतीत आईवडील तसेच लहान बहिणीसह राहत होती. गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई ममता दुबे (46) हिने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तिचा चेहरा सुजलेला होता. तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याचे निशाण होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नसून गळा दाबून केल्याचे निष्पन्न झाले
आत्महत्येचा बनाव केला
नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी या हत्येविषयीची माहिती पत्रकारांना दिली आहे. मृत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजताच तिने मुलीला बेदम मारहाण केली. मृत मुलीच्या 17 वर्षीय लहान बहिणीने पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातावर चावा घेतला. तसेच दोरीने गळा आवळून मुलीची हत्या केली. मात्र हत्या दडपण्यासाठी तिने अस्मिताने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. दुसरी आरोपी अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलांची भूमिका काय आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List