मराठी साहित्याचा ‘दिल्ली दरबार’ सुना सुना! मोदींसाठी ‘सरकार’ आले… दुसऱ्या दिवशी मात्र पाठ फिरवली
>> शिल्पा सुर्वे
तालकटोरा येथे सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुक्रवारचा पहिला दिवस राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने गजबजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार म्हणून मोठा तामझाम होता. आयोजक आणि राज्य सरकार कामाला लागले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सरकारने संमेलनाकडे पाठ फिरवली. ढिसाळ नियोजनामुळे सावळागोंधळ झाल्याचे दिसून आले. साहित्यप्रेमी, विशेषकरून साहित्यिकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. स्थानिक मराठी बांधव संमेलनाच्या मांडवापासून दूर राहिल्याचे दिसत होते. त्यामुळे मराठी साहित्याचा ‘दिल्ली दरबार’ सुना सुना झाल्याचे चित्र होते.
दिल्ली संमेलनात दुसऱ्या दिवशी कार्यक्रमांचे वेळापत्रक कोलमडले. एकाच वेळी दोन दोन कविसंमेलने होती. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा लांबल्याने शुक्रवारचे निमंत्रितांचे कविसंमेलन झाले नाही. ते शनिवारी सकाळी ठेवण्यात आले. निमंत्रितांच्या कविसंमेलनात जास्त कवी असल्याने कार्यक्रम लांबला. त्यामुळे बहुभाषिक कविसंमेलन वेळेत होऊ शकले नाही. त्यामुळे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ आणि ‘मराठीचा अमराठी संसार’ हे कार्यक्रमदेखील अन्य सभागृहात घेण्यात आला, मात्र नेमका कुठला कार्यक्रम कुठे होणार याची उपस्थितांना माहिती मिळत नव्हती.
लेखक-कवींसाठी दिल्ली दूरच
संमेलनाला माजी संमेलनाध्यक्षाना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पूर्व संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे हेच उपस्थित होते. याशिवाय मोठे लेखक आणि कवी यांच्यासाठी दिल्ली दूरच राहिली. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, सुनीलकुमार लवाटे असे मोजके साहित्यिक वगळता इतरांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
दिल्लीतले संमेलन म्हणजे सरकारी संमेलन अशी टीका साहित्य वर्तुळात सुरू होती. त्याचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे राज्य सरकारने हे संमेलन प्रतिष्ठेचे केले होते.
इंद्रजित भालेराव निघून गेले
कवी इंद्रजित भालेराव निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र शुक्रवारी कवी संमेलन झाले नाही. ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाले. यामुळे इंद्रजित भालेराव कवी संमेलन अर्ध्यावर सोडून गेले. याविषयी विचारले असता भालेराव म्हणाले, कार्यक्रमाचे नियोजन बिघडले. कार्यक्रम काल झाला नाही. माझे विमानाचे तिकीट आधीच काढलेले होते. त्यामुळे निघावे लागले.
100 स्टॉल्सचा दावा मात्र पुस्तकांचे गाळे रिकामे
संमेलनात पुस्तकांचे 100 स्टॉल असल्याचा दावा करण्यात आला, मात्र काही गाळे रिकामे आहेत. मंडपात छत नसल्याने दव पडून पुस्तके खराब होतात. तसेच पुस्तक विक्री जास्त नाही. यावरून ग्रंथ प्रदर्शनाचे संयोजक आणि प्रकाशक यांच्यात वाद झाल्याचे समजते. त्यांनी 15 ते 20 गाळे बंद करण्याचा निर्णय घेतला. वाचकांनीही पुस्तकांच्या खजिन्याकडे पाठ फिरवली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List