युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, राज्यपालाकडे कुणी केली मागणी ?
युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने समय रैना याच्या इंडियाज गॉट लेटेंट ( Indias Got Latent ) या ब्लॅक कॉमेडी शोमध्ये पालकांविषयी अश्लाघ्य भाषेत टिपण्णी केल्याने देशभर गदारोळ माजला आहे. या प्रकरणात समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया याच्यासह या शोला आलेल्या सर्वच कलाकारांवर कारवाईसाठी मुंबईच्या खार पोलिस आणि सायबर क्राईमने तपासासाठी नोटिस बजावली आहे. देशातील अनेक राज्यात या प्रकणात गुन्हे दाखल झाले आहेत.या प्रकरणानंतर अभिनेत्री राखी सावंत हिला देखील नोटीस बजावली आहे.आता या प्रकरणात एका संस्थेने महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहीले असून रणवीर अलाहाबादिया याला दिलेला पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱी संस्था शगुन फाऊंडेशन यांनी युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. शगुन गुप्ता यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन ( C.P. Radhakrishnan) यांना पत्र लिहिले आहे. रणवीर याने एका शो दरम्यान पालकांमधील नातेसंबंधांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करून भारतीय संस्कृती आणि पालकांचा अपमान केला आहे. युट्यूबर रणवीर अलाबादिया याने पालकांचा अपमान केला असून बिभत्सपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून पालक आणि मुलाच्या नात्याचा अपमान केलेला असल्याचे अध्यक्ष डॉ. शगुन गुप्ता यांनी राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत आई आणि वडिलांच्या स्थानाला यामुळे धक्का बसला असून अश्लाघ्य आणि बिभत्सपणाच्या हद्द ओलांडली गेली आहे. रणवीर अलाबादिया याने तरुणांना चुकीचा संदेश देण्याचे काम केले आहे. हा आपल्या संस्कृतीचाच घोर अपमान आहे. रणवीर अलाबादिया याला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकताच राष्ट्रीय पुरस्कार ( भारताचा सर्वोत्कृष्ट YouTube कंटेन्ट पुरस्कार ) देण्यात आला आहे.
राज्यपालांकडे काय केली मागणी
डॉ. शगुन गुप्ता यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठवविलेल्या पत्रात म्हणतात की माननीय महामहिम, या घटनेचा विचार करता, YouTuber रणवीर अलाबादिया याला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार ( भारताचा सर्वोत्कृष्ट YouTube कंटेन्ट पुरस्कार ) परत घेतला गेला तर भविष्यात अशी कोणतीही घटना कोणाकडून घडणार नाही. म्हणून जनतेत योग्य तो संदेश जाण्यासाठी रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार सरकारने मागे घ्यावा अशी मागणी आपण केली असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. शगुन गुप्ता यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List