ओस्तवाल बिल्डरचा अटकपूर्व जामीन रद्द, भाईंदरमध्ये बनावट सीसी तयार करून इमारती बांधल्या; 440 फ्लॅट विकले
मीरा-भाईंदर महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र तयार करून जेसलपार्क परिसरात इमारत बांधणाऱ्या ओस्तवाल बिल्डरचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या बिल्डरने या प्रकल्पातील 440 गाळे आणि फ्लॅटची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली होती. याप्रकरणी याप्रकरणी मे 2021 मध्ये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने बिल्डरचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे.
भाईंदर पूर्वेला जेसलपार्क परिसरात ‘ओसवाल ऑर्नेट’ ही इमारत बांधताना मूळ बांधकाम नकाशात बदल करून शासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या बनावट स्टॅम्पचाही वापर झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बिल्डर उमरावसिंग ओस्तवाल याच्याविरोधात 20 मे 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. जून 2021 मध्ये त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शिजॉय मॅथ्यू यांनी तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून संगीता शिंदे यांनी बाजू मांडली. मृत्यूझा नझमी, शंभू झा व कन्हाई बिश्वास यांनीही बाजू मांडून युक्तिवाद केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List