मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात वाद झाला आणि त्या वादातून तिने हे पद सोडलं. मात्र आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. ममताने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने एक व्हिडीओ जारी करून त्यात ही माहिती दिली आहे. ममताने 1 मिनिट 14 सेकंदाचा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात तिने ही माहिती दिली आहे. तसेच महामंडलेश्वर पद सोडण्याचं नेमकं कारणही तिने पहिल्यांदाच उघड केलं आहे.
माझ्या गुरू स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काही लोकांनी चुकीचे आक्षेप घेतले होते. त्यामुळे मी दु:खी झाले होते. त्या भावनेतूनच मी महामंडलेश्वर पद सोडलं. महामंडलेश्वर झाल्यावर मी माझ्या गुरूला भेट दिली होती. छत्र, छडी आणि चंवर भेट म्हणून माझ्या गुरूला दिले होते. त्यानंतर उरलेली रक्कम मी भंडाऱ्यासाठी दिली होती. मला पुन्हा महामंडलेश्वर पदी बसवल्याबद्दल मी माझ्या गुरूची कृतज्ञ आहे. या पुढे मी माझं आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला अर्पण करणार आहे, असं ममताने म्हटलं आहे.
गुरू काय म्हणाल्या?
किन्नर आखाड्याच्या पाठीधीश आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यमाई ममता नंद गिरी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलीय आणि ती कायम महामंडलेश्वर राहील. तिने भावनेच्या भरात पदाचा राजीनामा दिला होता. पण आम्ही तो स्वीकारला नाही, असं त्रिपाठी यांनी सांगितलं. त्यानंतर ममतानेही आपण महामंडलेश्वर पद पुन्हा स्वीकारल्याचा व्हिडीओ जारी करून आपल्या गुरुच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
अवघ्या 15 दिवसात…
ममता कुलकर्णीने 24 जानेवारी रोजी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं होतं. तिचा पट्टाभिषेकही करण्यात आला होता. 10 फेब्रुवारी रोजी ममताने एक व्हिडीओ जारी करून महामंडलेश्वर पद सोडल्याचं सांगितलं. तसेच किन्नर आखाड्याशी आपला काहीच संबंध राहणार नसल्याचंही जाहीर केलं होतं.
ममता काय म्हणाली होती?
ममता कुलकर्णीने 10 फेब्रुवारी रोजी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद सोडलं होतं. त्यावेळी तिने व्हिडीओतून संवाद साधला होता. मी महामंडलेश्वर यामाई ममता नंद गिरी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यामुळे किन्नर आखाड्यात वाद सुरू झाले आहेत. मी 25 वर्षापासून साध्वी होते आणि कायम साध्वी राहणार आहे. मला महामंडलेश्वराचा सन्मान देण्यात आला. पण काही लोकांना ते खटकलं. मग ते शंकराचार्य असो की आणखी कोणी. मी तर बॉलिवूडला 25 वर्षापूर्वीच सोडलं होतं, असं ममताने म्हटलं होतं.
मेक अप आणि बॉलिवूडपासून एवढं लांब कोण राहतं? मी 25 वर्ष तपस्या केली आहे. मी स्वत: गायब होते. मी काय करते? असं लोक नेहमी म्हणतात. नारायण तर सर्व संपन्न आहेत. ते तर विविध प्रकारचे आभूषण घालून महायोगी आहेत. देव आहेत. तुम्ही कोणत्याही देवी देवतांचे फोटो पाहा. त्यांचा श्रृंगार काही कमी आहे का? माझ्यासमोरही सर्वजण याच श्रृंगारात आले होते, असंही तिने म्हटलं होतं.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List