ऑप्टिकल केबल जोडणीसाठी रस्त्यांची वाट ! महानेट प्रकल्प कंपनीची मुजोरी
करमाळा तालुक्यात महानेट प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी अनेक रस्त्यांच्या साईडपट्टी उखडून काम करण्यात येत आहे. संबंधित कंपनीकडून रात्री-बेरात्री खोदकाम केले जात आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाच्या ‘डिजिटल भारत’ अभियानाचा भाग असलेल्या महानेट प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालये म्हणजे तलाठी, ग्रामपंचायत कार्यालये, शासकीय दवाखाने यांना इंटरनेट सुविधा रिलायन्स कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. याची जोडणी व वापराचे शुल्क शासनाद्वारा दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या या प्रकल्पास राज्य शासनाचे समर्थन आहे व वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व नियम अटी धाब्यावर बसवून काम करणाऱ्या या कंपनीस जिल्हा प्रशासनाकडून रेड कार्पेट अंथरले आहे. तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नोटिसीला केराची टोपली दाखवत संबंधित कंपनीकडून रस्त्याच्या साईडपट्टी फोडण्याचे काम जोमाने सुरू आहे.
महानेट प्रकल्पांतर्गत या ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी करमाळा तालुक्यातील कोर्टी ते आवाटी, करमाळा ते टेंभुर्णी, कुंभेज ते जिंती मोठ्या राज्य मार्गावरीलदेखील साईडपट्ट्या उखडण्यात आल्या आहेत. उखडलेल्या साईडपट्टीचा मुरुम रस्त्यावर येणे, अर्धवट उखरुण ठेवणे यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
महामार्गाबरोबरच पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत झालेल्या अरुंद रस्ता उखडून काढल्याने साईडपट्टी ढिसाळ बनली आहे. याचे पावसाळ्यात गंभीर परिणाम जाणवणार आहेत. अरुंद रस्त्यावर एसटी किंवा ऊसवाहतूक, माल वाहतूक करणारे अवजड वाहन क्रॉसिंगसाठी साईडपट्टीवर आल्यास खोदलेल्या या ठिसाळ साईडपट्टी खचून वाहन पलटी होण्याचा धोका वाढला आहे.
ठेकेदारांचा मनमानी कारभार
राज्य शासनाला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असून, शासनाने जिल्हा पातळीवरील विभागप्रमुखांना जोडणीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुचित केले आहे. यासाठी शासनाने सर्वप्रकारच्या परवानगी आणि शुल्कात सूट दिली असल्याचे सांगितले जात आहे. तर केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. आम्हाला सर्व परवानगी आहेत, असे सांगून कंपनीचा ठेकेदारांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
बांधकाम विभागाकडून कंपनीला नोटिसा
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता, ‘आम्ही सदर कंपनीस नोटीस बजावली असून, तरीदेखील गटारी व साईडच्या चारीतून केबल टाकण्याऐवजी साईडपट्टीवर खोदून टाकली जात आहे. याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवले असून, पुढील कारवाई करू,’ असे सांगितले आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List