38th National Games- टेबल टेनिसमध्ये जश मोदीला सुवर्ण, दिया- स्वस्तिका जोडीला सुवर्ण; स्वस्तिकाला रौप्य, पृथा वर्टीकरला कांस्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या जश मोदी याने तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जी. साथिथन याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला आणि पुरुषांच्या एकेरीत सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या दिया चितळे व स्वस्तिका घोष या जोडीने महिला दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकून दिले. महिला एकेरीच्या संघर्षपूर्ण अंतिम लढतीनंतर महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पृथा वर्टीकरला कांस्यपदक मिळाले.
पुरुषांचा एकेरीचा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. त्यामध्ये मोदी याने हा सामना 7-11, 6-11, 11-7, 11-8, 14-12, 6-11, 11-6 असा जिंकला. पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर मोदीला सूर गवसला. त्याने लागोपाठ तीन गेम्स घेत सामन्यास कलाटणी दिली. तथापि पुन्हा सहाव्या गेममध्ये साथियन खेळावर नियंत्रण मिळवले आणि ही गेम घेत सामन्यात 3-3 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सातव्या गेम विषयी उत्कंठा निर्माण झाली. मोदी याने टॉप स्पिन फटक्यांचा खेळ करतानाच प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला. ही गेम घेत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याआधी, महिला दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या जोडीने निथाया श्री मनी व काव्य श्री बैस्सा या तामिळनाडूच्या जोडीचा 3-2 (6-11, 8-11, 11-9, 11-7, 11-6) असा पराभव करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने तमिळनाडूच्या एस. सेलेना हिला कडवी लढत दिली. मात्र, टाळता येण्याजोग्या अनेक चुका केल्यामुळे स्वस्तिकाचा पराभव झाला. तमिळनाडूच्या सेलेनाने ही लढत 11-7, 11-2, 6-11, 7-11, 11-7, 11-9 अशी 4-3 ने जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याआधी, महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकरला तमिळनाडूच्या सेलेना हिने 7- 11, 16- 14, 11- 7, 11- 9, 11- 6 असे 4-1 फरकाने हरविले. त्यामुळे पृथा वर्टीकरला कांस्यपदक समाधान मानावे लागले.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List