‘ते संविधान परत छापा… बघू कोण विरोध करतं’; राज्यपाल हरिभाऊ बागडे आक्रमक
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर महापुरुषांचे फोटो होते, असा दावा त्यांनी केला आहे. संविधानातून काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना बागडे यांनी नाशिकच्या नोटप्रेसमध्ये संविधानाची प्रत इंग्रजीमध्ये छापण्यात आली, त्यानंतर तिथेच हिंदीत त्याचं भाषांतर केल्याचा दाखलाही दिला.
नेमकं काय म्हणाले हरिभाऊ बागडे?
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना देण्यात आला आहे, या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे बोलत होते. ‘या वाचनालयानं आशिष शेलार यांना पुरस्कार दिला, त्या निवड समितीचं मी कौतुक करतो. आशिष शेलार हे मोठ्या पदावर जावो अशी प्रार्थना करतो. नाशिकमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे नाशिक आपलंस वाटतं.’ नाशिक शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. पण याच ठिकाणाहून सितेचं हरण झालं. आजही काही घरांमध्ये सीतेला वनवास भोगावा लागतो.
नाशिक शहरात काळाराम मंदिर आहे, त्याच मंदिरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर येऊन गेले आहेत. मी याच शहरात कुसुमाग्रजांना भेटलो होतो. मी अन्न पुरवठा मंत्री होतो तेव्हा कुसुमाग्रजांना भेटलो होतो, त्यावेळी रेशन कार्डवर त्यांची कविता छापली होती. बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं ते छापलं नाशिकच्या प्रेसमध्ये, इंग्लिशमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्या संविधानामध्ये अनेक चित्रं होती, पण ती काढली. आता आपण परत आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे, मग बघू कोण विरोध करतं,’ असं यावेळी हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही संघात काम करायचो लोक आम्हाला हिणवायचे. काळ्या टोप्या घालणारे म्हणायचे. मोठा संघर्ष केला आणि आज आम्ही अच्छे दिन पाहतोय. मागच्या पन्नास वर्षांपूर्वी जे पाहिजे होतं ते आम्ही आज पाहात आहोत, असं बागडे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List