नागपुरातही ताज हॉटेल उभारणार, ताज ग्रुपची घोषणा; मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला एका मिनिटात मान
नागपुरातही आता ताज ग्रुपची एन्ट्री होणार आहे. ताज ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची निर्मिती झाली पाहिजे, अशी इच्छा बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांचं भाषण होताच ताज ग्रुपने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मिनिटभरातच नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे आता नागपूरकरांना लवकरच ताजमध्ये जाण्याचा योग येणार आहे.
ताज ग्रुपकडून मुंबईतील वांद्रे येथे एका हॉटेलची उभारणी होत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातही ताज हॉटेल असावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ताज ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली. सोबतच दुसऱ्या जिंजर हॉटेलची देखील उभारणी करण्याची घोषणा केली. नागपुरात आधीच एक जिंजर हॉटेल आहे. त्यात आणखी एका जिंजर हॉटेलची भर पडणार आहे.
मुंबईच्या सौंदर्यात भर
वांद्रे परिसरात इतक्या सुंदर हॉटेलची उभारणी करत असल्याबद्दल मी इंडियन हॉटेलचे आभार मानतो. हे हॉटेल रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे होते. हॉटेल उभारणीत काही अडचणी येत असल्याचं त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. या हॉटेलच्या प्लानिंग आणि डिझाईनमुळे मुंबईच्या सुंदरतेत आणखी भर पडणार आहे. ताज ग्रुपचम महाराष्ट्रात चांगलं प्रस्थ आहे. पण ताज ग्रुपचं नागपुरात हॉटेल नाही. ताज ग्रुपने नागपुरात हॉटेल उभारलं पाहिजे. तुम्ही आजच याबाबतची घोषणा करावी अशी माझी इच्छा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत असल्यासारखं वाटतं
21 व्या शतकातील मॉन्यूमेंट म्हणून हे हॉटेल समोर येईल असा विश्वास आहे. ताज ग्रुपने हॉस्पिटॅलिटीची व्याख्या बदलली आहे. अनेक देशात ताज ग्रुपचं प्रस्थ आहे. त्यामुळे परदेशातही आपण मुंबई किंवा भारतातच आहोत, असं वाटतं, असं फडणवीस म्हणाले.
आणखी हॉटेल उभारा
रतन टाटा यांच्या जाण्याआधी हे हॉटेल उभं राहिलं असतं किंवा भूमिपूजन झालं असतं तर त्यांना आनंद झाला असता. कदाचित आम्ही पण त्यातील समस्या सोडवण्यात कमी पडलो. प्रकल्प उभारणी संदर्भात काही अडचणी आल्या तर आम्ही पाठीमागे उभं राहू. विकासासाठी आम्ही एकप्रकारे पार्टनर आहोत, मुंबईला आणखी अशा हॉटेलची अपेक्षा आहे. तुम्ही अजून काही हॉटेल्सची उभारणी करावी असं आवाहन मी तुम्हाला करतो, असं आवाहनही त्यांनी केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List