बलात्काराचा आरोप करून मिळवले 1 लाख, नंतर तिने साक्षच फिरवली, अखेर..
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराची तक्रार दाखल करून सरकारी मदत मिळवल्यानंतर न्यायालयात साक्ष फिरवणाऱ्या महिलेला 1 लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यासंदर्भात महिलेवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या अजब प्रकारामुळे आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सरकारी योजनेचा गैरफायदा घेतल्याने आणि न्यायालयात ऐनवेळी साक्ष बदल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून या महिलेला योजेनची रक्कम परत करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
नेमकं घडलं काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा कल्याणमधील ही महिला 40 वर्षांची होती. त्या महिलेच्या पतीला मानसिक आजार असल्यामुळे त्यांना 2017 साली ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच घटनेचा त्या महिलेच्या दिराने फायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी कल्याण पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
त्यानंतर शासनाच्या “मनोधैर्य योजने” अंतर्गत पीडित महिलेच्या बँक खात्यात थेट 25 हजार रुपये जमा करण्यात आले, तर उर्वरित 75 हजार रुपये मुदत ठेवीत ठेवण्यात आले. मात्र, न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महिलेला सरकार पक्षाची बाजू उचलून धरावी लागते, पण तिने कोर्टात आपली साक्ष बदलली, आणि आरोपी निर्दोष मुक्त झाला. यानंतर महिलेने उर्वरित 75 हजार रुपये मिळावेत यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला. पण चौकशीत तिने साक्ष फिरवल्याचे स्पष्ट झाल्याने हे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या समितीसमोर ठेवण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार, जर पीडित महिलेने न्यायालयात साक्ष फिरवली असेल, तर तिला मिळालेली आर्थिक मदत व्याजासह परत करावी लागते.
याच पार्श्वभूमीवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तिच्या बँक खात्यातील मुदत ठेवीची रक्कम गोठवली असून उर्वरित 25 हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायव्यवस्थेचा गैरवापर आणि सरकारी योजनांचा दुरुपयोग कसा केला जातो याचे उदाहरण ही घटना आहे. प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List