Shraddha Murder Case : अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचं अचानक निधन झालं आहे. श्रद्धाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले होते. विकास वालकर असं श्रद्धाच्या वडिलांचं नाव असून वसईत राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे.
2022 मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची हत्या केली होती. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. यावेळी त्यांची प्रचंड धावपळ होत होती. तसेच ते सतत तणावात होते, असं सूत्रांनी सांगितलं.
काय घडलं?
श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला होता. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून तिचे मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचंही उघड झालं होतं. फ्रिजमधून रोज काही तुकडे काढून ते दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकायचा, असं पोलीस तपासात आढळून आलं होतं.
सहा महिन्यानंतर तक्रार
आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. तसेच तिच्या शरीराचे तुकडे त्याने 300 लीटर फ्रिजमध्ये ठेवले होते. ही घटना दिल्लीच्या महरौली येथे घडली होती. त्याने आधी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर श्रद्धाचे वडील विकास यांनी मुलगी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अडीच महिन्यापासून आपल्या मुलीचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला होता.
वसईची राहणारी
आफताबने श्रद्धाची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळून टाकला होता. रात्रीच्यावेळी तो घरातून बाहेर पडायचा आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022मध्ये आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. आफताबसोबत रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी श्रद्धा ही आई वडिलांसोबत वसईला राहत होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List