गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण झालेल्या सीएचा सोलापुरात मृत्यू
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. मृत तरुण डीएसके विश्व धायरी भागामध्ये वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीमध्ये तो सनदी लेखापाल (सीए) म्हणून कार्यरत होता.
सदर तरुणाला 11 जानेवारी रोजी जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. याच दरम्यान तो काही कामानिमित्त सोलापुरात आपल्या घरी गेला होता. तब्येत खालावल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) ची लागण झाल्याचे निदान झाले.
उपचार सुरू असताना रुग्णाची तब्येत स्थिर होती, मात्र त्याला हालचाल करता येत नव्हती. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर असल्याने त्याला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले, पण काही वेळातच श्वास घेण्यास त्रास झाला आणि यातच त्याची प्राणज्योत मालवली.
‘जीबीएस’ची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
दरम्यान, ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या एका 67 वर्षीय महिलेचा न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने मृत्यू झाला. या महिलेवर अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते. ‘जीबीएस’मुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
पिंपरी परिसरात वास्तव्यास असलेल्या या महिलेला 13 नोव्हेंबर 2024 रोजी अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे महिला खासगी रुग्णालयात गेली. औषधे घेतल्यानंतर त्रास कमी होत नसल्याने 17 नोव्हेंबर रोजी महिला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल झाली. तेथे ‘जीबीएस’ या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान महिलेला न्यूमोनियाची लागण झाली. महिलेला पुढील उपचारांसाठी 29 डिसेंबर रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान 21 जानेवारी 2025 रोजी महिलेचा मृत्यू झाला.
महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला? उपचारांत हयगय झाली का? याची चौकशी करण्यासाठी ‘वायसीएम’ने 10 जणांची समिती स्थापन केली. उपचारांत कोणतीही हयगय झाली नाही. महिलेला उच्च रक्तदाब होता. न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने मृत्यू झाल्याची तीन कारणे समितीने दिली आहेत. शेवटी ‘जीबीएस’चेही कारण देण्यात आले आहे.
महिलेला ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर न्यूमोनिया झाला. न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने महिलेचा मृत्यू झाला. ‘जीबीएस’मुळे मृत्यू झाला नाही.
डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय
दरम्यान, शहरात ‘जीबीएस’ या आजाराचे 12 रुग्ण होते. त्यांपैकी चार रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आठ रुग्णांवर ‘वायसीएम’ सह शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
‘जीबीएस’च्या रुग्णांना नोरोव्हायरसचा संसर्ग
गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) नऊ रुग्णांमध्ये नोरोव्हायरस तर तीन रुग्णांमध्ये ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’चा संसर्ग झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालातून समोर आले आहे. ‘नोरोव्हायरस’ आणि ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’चा संसर्ग दूषित पाणी व अन्नाद्वारे होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी – उकळून प्यावे, स्वच्छ व ताजे अन्न – सेवन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णांची संख्या 73 झाली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक 44 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरात 11 आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे. इतर तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. 73 रुग्णांपैकी 47 पुरुष रुग्णांचा, तर 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील 14 रुग्णांवर ‘व्हेंटिलेटर’वर उपचार सुरू आहेत. जीबीएसच्या 24 रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. त्यातील 9 जणांना ‘नोरोव्हायरस’ तीनजणांना ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List