परीक्षण – विखंडित वर्तमानाचे भेदक दर्शन
<<< प्रा. सुजाता राऊत >>>
साधारण 2000 नंतरच्या काळात जागतिकीकरणाचे परिणाम अधिकच गडद होत गेले. भारतीय जीवनपद्धती या परिणामांना सरावली होती. 90 नंतरची मराठी कविता ही प्रामुख्याने जागतिकीकरणात होणारी पडझड व उलाघाल व्यक्त करणारी, पडसादाची कविता होती. तीच कविता काही सकस कवींच्या लेखनात उत्तरोत्तर अधिक आशयनिष्ठ होत गेली. ज्येष्ठ कवी अशोक कोतवाल यांच्या ‘खांदे सुजलेले दिवस’ या अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या संग्रहातील कविता वाचताना याचा अनुभव येतो. आपल्या भवतालात अस्वस्थता दाटली आहे. चराचरात हरवत जाणारी लय दिसत आहे. आयुष्यातली कोवळीक हरवून गेली आहे व समाजजीवनातील निरागसता लोप पावताना दिसत आहे. त्यानंतर सामोरे येणारे वर्तमान पेलताना संवेदनशील मन मिटून जाते. या दिवसांचा भार खांदे सुजवणारा आहे अशा प्रकारचे आशयसूत्र या कवितांमध्ये असले तरी सर्व कवितांमध्ये वैविध्य आहे, कुठेही एकसुरीपणा नाही.
‘रथ ओढणारे लोक’ या पहिल्याच कवितेत एक मूलगामी भाष्य आहे. ‘रथांच्या घोडय़ांना दृष्टी असतेच कुठे? नजर असते सरळ रेषेत चालणारी’ अशा शब्दांत कवीने ते व्यक्त केले आहे. त्यातून प्रतीत होणारा आशय व अनेकार्थ या दृष्टीने या कविता महत्त्वाच्या आहेत.
‘मध्यरात्री ऐकू येतो मला
एक महाकरुण ध्वनी
आणि हळूहळू बुद्धाकडे सरकू लागतो.’
कवी फक्त भोवतालावर बोलत नाही तर आपल्या आतल्या आवाजाची दखल घेतो. समकाळात होत असणाऱ्या आघातांबरोबर मन बधिर होते. आतून विस्कटलेपण येते. त्याचे दर्शन घडवणारे व त्यातून पुन्हा सावरणारे मन अशा दोन्ही प्रकारचे विचार इथे दिसतात, ते अतिशय भेदक व नेमक्या शब्दांतून कवीने समोर ठेवले आहेत. अनेक कवितांतून समकाळावर केलेले भेदक भाष्य आहे. या कवितांची शैली थेट आहे. कमी शब्दांत आशय मांडणारी शैली हा चांगल्या कवितेचा ठळक विशेष इथे प्रामुख्याने जाणवतो. काही ठिकाणी कवीने एखादी थीम वापरली आहे. त्याचा कुठेच उल्लेख न करता, पण आशयघन निर्मिती करत ही कविता पुढे जाते. उदाहरणार्थ ‘राजा रडला’ ही कविता. राजा रडला कुणी रडवले या विवंचनेत असलेली प्रजाही ढसाढसा रडू लागते. राजा रडला या कवितेचा उत्तरार्ध वाटावा अशी महाचर्चा ही कविता तर सद्यस्थितीवर खोल भाष्य करणारी आहे.
या संग्रहामध्ये एक वेगळा विभाग ठरावा अशा विठ्ठलावरच्या कविता अतिशय महत्त्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या विठ्ठलाचे परंपरागत रूप दाखवणाऱ्या नाहीत तर त्यापलीकडे तटस्थ चिकित्सा करणाऱ्या व विठ्ठल आणि त्याचे साधेसुधे भक्त यांच्या नात्यांचा वेध घेणाऱ्या आहेत. ‘रखुमाईचे आर्जव’पासून ही कवितांची मालिका सुरू होते. ती म्हणते मला हे लादलेले देवपण नकोय, तर मला बाईपण दे. दगडी काळोखात जीव गुदमरतोय माझा. मला माझी षडविकारी काया दे. अशा समर्पक शब्दांत ही कविता परिणामकारक ठरते. पुढे ती विठ्ठलाला काही प्रश्न विचारते.
मी एका नजरेलाही पारखी असताना वामांगी कशी? थेट व भेदक प्रतिमा या सर्वच कवितांमध्ये दिसतात. ‘दिंड्या निघून गेल्यानंतरची चंद्रभागा लक्तरे पांघरून विठ्ठलाच्या दारी जाते.’ दिंडी झाल्यानंतर अवकळा आलेले तिथले वातावरण, तिथले उन्मादी भक्त यावरती भेदक भाष्य आपले मन अस्वस्थ करते. विठ्ठल आणि कुणबीणी, पंढरपुरात, पंढरीचा कुकू बुक्का, तो काळा नाही साधा भोळा अशा अनेक कवितांतून विठ्ठलाचं त्याच्या साध्या सरळ भक्तांच्या मनात असलेले रूप रेखले आहे.
‘खांदे सुजलेले दिवस’ हे संग्रहाचे शीर्षकच या समकाळाचे ताण, त्यातून निर्माण झालेले जडशीळ प्रश्न व त्यांचा भार त्यातून येणारी हतबलता प्रतीत करणारे आहे. आजच्या वर्तमानात मनात उठलेला कल्लोळ व साचलेला, दाबून ठेवलेला आकांत संयतपणे प्रकट होतो, पण तरीही त्याचा परिणाम तीक्ष्ण आहे.
‘मला व्हायचंय एक अनाम प्रश्नचिन्ह माझ्या समकाळावर उमटलेलं’ अशा शब्दांत ते व्यक्त होते. हे कवीचे अस्वस्थपण दुहेरी आहे. ‘खाता येत नाही कविता भाकरीसारखी’, ‘कवितेतली गायब झालेली ओळ’ अशा अनेक प्रतिमा वेधक आहेत. तुकाराम ही लहानशी, पण अत्यंत आशयपूर्ण कविता आहे.
‘मला प्रचंड भूक लागते
तेव्हा मी भाकरीसारखा
तोडून खातो तुकाराम…’ कवीची भूमिका व त्याच्या आशयनिष्ठ शैलीचं दर्शन घडवणारी ही कविता आहे. काळजातून ठणक निघून कागदावर जाऊन बसलेली ही कविता मन अस्वस्थ करते.
खांदे सुजलेले दिवस
कवी : अशोक कोतवाल
प्रकाशन : राजहंस प्रकाशन
पृष्ठे : 129
किंमत : 200 रुपये
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List