वक्फवरील जेपीसी बैठकीत राडा, शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षाचे दहा खासदार निलंबित
वक्फ संशोधन विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समितीच्या (जेपीसी) बैठकीला आज पुन्हा वादाचे गालबोट लागले. वाद इतका विकोपाला गेला की, जेपीसीचे अध्यक्ष, खासदार जगदंबिका पाल यांनी विरोधी पक्षांचे दहा खासदार एका दिवसासाठी समितीतून निलंबित केले. जम्मू-कश्मीरचे प्रतिनिधी मंडळ मिरवाईज उमर फारूख यांच्या नेतृत्वाखाली जेपीसीपुढे आपली भूमिका मांडण्यासाठी आले होते. त्यापूर्वीच हा हंगामा झाला. भाजप खासदार निशिकांत दुबे व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात या वेळी जोरदार बाचाबाची झाली. कल्याण बॅनर्जी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप जगदंबिका पाल यांनी केल्यामुळे वातावरण तापले.
जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल हे मनमानी पद्धतीने समितीचे कामकाज करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या खासदारांनी या बैठकीत केला. प्रस्तावित बदलांवर अभ्यास करण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांना पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यांच्या म्हणण्याकडे अध्यक्ष दुर्लक्ष करतात, समितीच्या बैठका मनमानी पद्धतीने त्यांना हव्या त्या वेळेत बोलावतात, असे आक्षेप विरोधी पक्षांच्या खासदारांनी नोंदवले. समितीच्या पूर्वनियोजित बैठकीच्या वेळेत बदल झाल्याचा मेसेज रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी येतो. मग त्यानुसार आम्ही बैठकीला कसे उपस्थित राहायचे? आम्ही आमच्या मतदारसंघात जायचे की नाही? असा सवाल द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी उपस्थित केल्यावर तृणमूलच्या कल्याण बॅनर्जी यांनी या समितीत अध्यक्ष मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे वातावरण तापले. कल्याण बॅनर्जी व भाजपचे निशिकांत दुबे यांच्यात हमरीतुमरी रंगली.
– शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे ए. राजा, मोहंमद जावेद, नासीर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, नदीमूल हक व इमरान मसूद यांना निलंबित केले.
आम्ही गुलामासारखे उभे रहावे अशी त्यांची इच्छा – अरविंद सावंत
संयुक्त संसदीय समिती विक्षिप्त व हुकूमशाही पद्धतीने चालली आहे. हे लोक मनात येईल ते करत आहेत. आम्ही एखाद्या गुलामासारखे उभे रहावे अशी त्यांची इच्छा आहे, असे शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत म्हणाले. वक्फ सुधारणा विधेयक हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक आहे. यामुळे देशात अराजक निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही समितीकडे वेळ वाढवून मागितला, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर आम्ही रात्रभर जागून त्यावरील सुधारणा पाठवल्या. विधेयकातील प्रत्येक कलमावर चर्चा होणे आवश्यक आहे, पण जेपीसीचे अध्यक्ष एखाद्या खेळण्यासारखे हा विषय हाताळत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विधेयकाची घाई करत आहेत. भाजप केव्हाच देशाचा विचार करत नाही, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List