कथा एका चवीची – माहीमचा हलवा आणेन तुला…
>> रश्मी वारंग
थंडीच्या दिवसांमध्ये खाल्या जाणाऱया पदार्थांमध्ये हलव्याचा समावेश होतो. हलव्याचे अनेकविध प्रकार आहेत. त्यात माहीमचं नाव कसं गुंफलं गेलं, याबद्दल कुतूहल वाटतं. त्याच सुप्रसिद्ध माहीमच्या हलव्याची ही गोष्ट.
दोन रुपये दोन रुपये दे रे मला
खर्चाला पानसुपारीला
माहीमचा हलवा आणेन तुला
मराठी घरांमध्ये म्हटलं जाणारं हे गीत आजच्या पिढीला फारसं माहीत नसलं तरी सहज गुणगुणायच्या किंवा घरच्या घरी केल्या जाणाऱया नाचाच्या गाण्यांमध्ये एकेकाळी या लोकगीताचा समावेश होता. या गाण्यात उल्लेख झालेला माहीमचा हलवा म्हणजे नेमका कोणता हलवा? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये खाल्या जाणाऱया पदार्थांमध्ये हलव्याचा समावेश होतो. हलव्याचे अनेकविध प्रकार आहेत. त्यात माहीमचं नाव कसं गुंफलं गेलं, याबद्दल कुतूहल वाटतं. त्याच सुप्रसिद्ध माहीमच्या हलव्याची ही गोष्ट.
हलवा हा शब्द अरबी ‘हल्व’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. या शब्दाचा अर्थ होतो मिठाई. अरबी भाषेतील या शब्दाशी जी मिठाई जोडली गेली ती मूळ मिठाई खजुराची पेस्ट आणि दूध यापासून बनवली जायची. अरब व्यापाऱयांकडून हा हलवा भारतात आला. भारतातील उपलब्ध पदार्थांप्रमाणे पाककृती बदलत गेली आणि विविध प्रकारचे हलवे भारतामध्ये तयार होऊ लागले. त्यातलाच एक माहीमचा हलवा.
मुंबई तेव्हा सात बेटांचे शहर होतं. माहीम त्यापैकीच एक. ब्रिटिशांच्या प्रयत्नांमुळे मुंबई शहर नव्याने वसत असताना बाहेरगावच्या अनेक मंडळींना या शहराने आकर्षित केलं. मुंबई बंदर होतं. त्यामुळे व्यापाराची इथे रेलचेल असे. भारतभरातून लोक आपलं नशीब आजमावायला मुंबई शहरात येत असत. त्यातच एक होते गुजरातमधल्या जामनगर येथील रहिवासी गिरीधर मावजी. जामनगर येथे त्यांचा हलव्याचा व्यवसाय होता. 1787 साली गिरीधर मावजी आपला व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी तत्कालीन बॉम्बे अर्थात आपल्या मुंबईमध्ये आले. माहीममध्ये त्यांनी आपलं बस्थान बसवलं. पिढीजात व्यवसायातून खास हलवा त्यांनी बनवायला सुरुवात केली. त्या काळात मुंबईमध्ये कराची हलवा लोकप्रिय होता. हा हलवा कराचीमध्ये तयार झाला असला तरी तो अधिक लोकप्रिय होण्यामागे मुंबई शहराचा वाटा मोठा होता. त्यामुळे या कराची हलव्याला बॉम्बे हलवा असेही म्हटले जाई. गिरीधर मावजी यांनी याच कराची अर्थात बॉम्बे हलव्याचे रूप बदलण्याचे प्रयोग केले. बॉम्बे हलवा बनवण्यासाठी मक्याचे पीठ वापरलं जाई. त्याऐवजी गिरीधर मावजी यांनी गव्हाच्या मैद्याचा वापर करून बघितला. अस्सल तुपात हा हलवा बनत असे. मूळच्या भावनगरी मिठायांचा अनुभव वापरत त्यांनी हा जो लुसलुशीत हलवा तयार केला तोच हा माहीमचा हलवा. माहीम परिसरामध्ये घरोघरी जाऊन गिरीधर मावजी हा हलवा विकत असत. गिरीधर यांचे केस पिकलेले होते. त्यामुळे त्यांना ‘बुढा काका’ असे म्हटले जाई. या बुढा काकाचा हा चविष्ट हलवा माहीम परिसरात अतिशय लोकप्रिय झाला आणि त्या हलव्याचे नामकरण ‘माहीम हलवा’ असे झाले. या माहीमच्या हलव्याला जवळपास 200 वर्षं जुना असा हा इतिहास जोडला गेला आहे. मूळच्या साध्या पाककृतीला आता नवनवीन स्वाद, सजावट, सुकामेवा यासह अधिक आकर्षक रूपात सादर केलं जातं. माहीमच्याच हलव्याला अलीकडच्या काळात अनेकांनी ‘आईस हलवा’ म्हणायला सुरुवात केलेली दिसते. त्याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे हा हलवा खायला इतका लुसलुशीत असतो की, बर्फाप्रमाणे तोंडात विरघळतो. त्यामुळे त्याला आईस हलवा म्हटलं जाऊ लागलं आहे.
आजही माहीम परिसरामध्ये गिरीधर मावजी यांची सातवी पिढी हा माहीमचा हलवा विकते. 2010 मध्ये या हलव्याला भौगोलिक मानचिन्ह (जीआय टॅग) प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक मिठाईचा आपला चाहता वर्ग असतो. माहीमचा हलवा मुद्दामून आणून खाणारे खवय्ये तसे कमीच. अन्य मिठायांचं वलय माहीम हलव्याला मिळालेलं नसलं तरीही मिश्र मिठाईच्या बॉक्समधून किंवा अलीकडच्या काळात अधिक आकर्षक रूपातून तो आपल्यासमोर येत राहतो. पांढऱया बटर पेपरच्या खाली लपलेला शुद्ध तुपातला आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा हलवा अनेकांसाठी खास शहरी चवीची ओळख करून देणारा आहे. मूळचा गुजराती, पण जुन्या मुंबईशी नातं सांगणाऱया गिरीधर मावजी तथा बुढा काका यांनी या हलव्याला दिलेली माहीम आणि अस्सल मुंबईची चव ही या पदार्थाची खरी ओळख.
अन्य मिठायांच्या तुलनेत कमी वेळा आपल्यासमोर हा माहीमचा हलवा येतो. वरचं कागदाचं आवरण दूर करत हलक्या हाताने मोडलेला तुकडा जिभेवर ठेवताच मैदा, साखर, केशर, सुकामेवा यांचा मिश्र स्वाद जिभेवर असा सहज विरघळतो की एकेकाळी दोन रुपयांचा असणारा हा हलवा खासमखास भासू लागतो. ओठांवर तेच शब्द येत राहतात.
दोन रुपये दोन रुपये दे रे मला
माहीमचा हलवा आणेन तुला…
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List