रोखठोक – इंदिरा गांधी कोण?

रोखठोक – इंदिरा गांधी कोण?

इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद!

कंगना राणावत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असल्याने त्यांनी `इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. ज्यांनी देशाच्या जडणघडणीत काहीच योगदान दिले नाही, असे आजचे सत्ताधीश व त्यांचे आंधळे अनुयायी हे सर्व करत आहेत. कंगना राणावत व त्यांच्या `इमर्जन्सी’ चित्रपटाने जे भारावून गेले त्यांना भारत कळलाच नाही. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी. आणीबाणीच्या अंमलबजावणीत काही अतिरेक झाले असतील. असा अतिरेक सध्या रोजच होत आहे व इतिहास भविष्यात त्याचेही मूल्यमापन करणारच आहे. भारताचा एक भाग असलेल्या मुंबईस (जी महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे) मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगना राणावतसारख्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी लावली हे सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी तर `बॉम्ब’ बनविण्याचा कारखानाच काढला होता. आज पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जाते. हे आणीबाणीचेच नवे रूप आहे. जॉर्ज यांना इंदिरा गांधींना बॉम्बने उडवायचे होते व त्याची प्रात्यक्षिके सुरू होती. आज पंतप्रधान व एखाद्या मुख्यमंत्र्यास निनावी धमकीचा फोन आला, पत्र आले तरी संशयावरून लोकांना तुरुंगात सडवले जाते. आणीबाणीत स्मगलर्स, काळाबाजारी, गुंड यांना तुरुंगात डांबले हे कंगना राणावत यांनी सिनेमात दाखवले नाही. देशाला शिस्त लावणे व अराजकवाद्यांना वठणीवर आणणे यासाठी आणीबाणी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय?

पोलादी बाई!

इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट व निर्मात्यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले. इंंदिरा गांधी या नेहरूंनंतरच्या खऱ्याखुऱ्या जागतिक नेत्या होत्या.

  • 1967 साली इंदिरा गांधी यांनी चीनबरोबर चांगले संबंध स्थापित करण्याची नीती स्वीकारली. भारताच्या परराष्ट्र धोरणातले हे महत्त्वाचे पाऊल होते.
  • 1971 साली इंदिरा गांधी यांनी बांगलादेश स्वतंत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानबरोबर `सर्जिकल स्ट्राईक’ची लुटपूट लढाई न करता पाकबरोबर युद्धच केले व पराभूत केले. 1947 च्या भारताच्या फाळणीचा बदला घेत पाकिस्तानची फाळणी घडवली.
  • इंदिरा गांधींनी वाघांच्या रक्षणासाठी वन्य जीव संरक्षण कायदा 1972 साली लागू केला. या कायद्यामुळे भारतातील अद्वितीय वन्य जिवांच्या सुरक्षेस बळ मिळाले.
  • इंदिरा गांधी यांनी 1974 साली पहिले पोखरण परमाणू परीक्षण केले व भारताला परमाणू शस्त्राने संपन्न देश म्हणून जगात लौकिक मिळवून दिला. भारताची `न्यूक्लिअर पॉवर’ बनण्याची ती सुरुवात झाली.
  • इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालीच सिक्कीमचा भारतात विलय झाला आणि ते भारतीय संघाचे 22 वे राज्य बनले.
  • इंदिरा गांधींनी 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. ज्यामुळे ग्रामीण क्षेत्रात गाव-खेड्यांपर्यंत बँकांचे जाळे पसरले आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.
  • 1982 साली इंदिरा गांधी यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. त्यामुळे कृषी व ग्रामीण विकास योजनांना आर्थिक सहाय्य मिळू लागले.

इंदिरा गांधींच्या कार्यकाळातच भारतात हरित क्रांतीचा उद्घोष झाला व देशाचे कृषी उत्पादन वाढले. ही एक अशी क्रांती होती की, कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले, नवे बीज वापरात आणले. त्यामुळे भारताची धान्य कोठारे भरत राहिली. श्वेतक्रांती, दूध उत्पादनाच्या वाढीसाठी इंदिरा गांधी यांनी अनेक उत्तेजनपर योजना आणल्या. त्यामुळे भारत दूध उत्पादनात आत्मनिर्भर बनला. इंदिराजींचे नेतृत्व कणखर व पोलादी होते. देशातील आधारभूत परिवर्तनाच्या त्या नायिका होत्या. आजचा विकास म्हणजे इंदिराजींनी केलेल्या पायाभरणीचे फळ आहे. इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे एका झटक्यात बंद केले. आज नवे संस्थानिक निर्माण झाले व त्यांच्यावर सरकारी कृपेचा वर्षाव होत आहे. गौतम अदानी यांना तर `महाराजा’चा दर्जा मिळाला आहे. असे अनेक महाराज आणीबाणीत तुरंगात जाऊन पडले होते व त्यामुळे लोक खूश होते.

हौतात्म्य!

इंदिरा गांधींच्या कार्याचे मूल्यमापन एका `आणीबाणी’वर तोलता येणार नाही. त्यांचे महानपण त्यांच्या बेडरपणात होते. राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौमतेला धोका निर्माण झाला हे पटताच त्यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे, सैन्य घुसवून भिंद्रनवाले व त्यांच्या अतिरेकी फौजांना खतम केले. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही व शेवटी याच कारवाईची किंमत चुकवत पंतप्रधानपदी असताना त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. शीख समाज आपल्या विरोधात गेलाय हे माहीत असतानाही त्यांनी आपले शीख अंगरक्षक बदलले नाहीत. काय हे धैर्य! मणिपूरच्या हिंसाचाराला व मनुष्यसंहाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे अनुयायी आज इंदिरा गांधी यांच्यावर चिखल उडवीत आहेत.

आणीबाणी हा एक अध्याय होता. त्यास दोन बाजू आहेत. पण त्यासाठी इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारे चित्रपट प्रदर्शित करणे राष्ट्रीय अपराध आहे.

कंगना राणावतचा `इमर्जन्सी’ चित्रपट साफ कोसळला. कारण देशाचा आत्मा जिवंत आहे!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक
चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या एक दहावीचा विद्यार्थी...
Mahakumbh 2025 – ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मत
उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव, मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, दहा किमी परिसरात हाय अलर्ट
OnePlus चा ‘हा’ टॅब पहिल्यांदाच मिळत आहे 19,749 रुपयांमध्ये, किंमत आहे 40 हजार; जाणून घ्या काय आहे ऑफर
Hero Xpulse 210 ची बुकिंग आणि डिलिव्हरी कधी होणार सुरू? किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Australian Open 2025 – यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले, अंतिम फेरीत झ्वेरेवचा केला पराभव
जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार? गनिमी कावा करणार; भरतशेठ गोगावले यांचं मोठं विधान