साहित्य जगत – शाश्वताचा सारथी

साहित्य जगत – शाश्वताचा सारथी

<<< रविप्रकाश कुलकर्णी >>>

तंत्र्य मिळण्यासाठी तळागाळातील सामान्य माणूस ते उच्चपदस्थ पंडित यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि आपणदेखील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही करू शकतो हा विश्वास निर्माण केला. हे एक असाधारण काम होते. एवढ्या मोठ्या समाजाला एका कल्पनेने कामाला लावणे असे यापूर्वी कधीही घडलेले नव्हते. म्हणूनच मोहनदास करमचंद गांधी या माणसाला सर्वजण महात्मा गांधी म्हणू लागले. पारतंत्र्यात असलेल्या, ब्रिटिशांच्या जोखडातून हिंदुस्थानाला मुक्त करण्यासाठी जे अनेक प्रयत्न झाले त्यात मोठा वाटा अर्थातच महात्मा गांधी यांचा होता, हे सर्व मान्य आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात काय झाले? काय घडत गेले? रिचर्ड अ‍ॅटनबर्ग यांनी निर्माण केलेल्या ‘गांधी’ चित्रपटाने गांधी काय होते आणि ते कसे मोठे होत गेले याचे उत्तम चित्र उभे केले. अर्थात ते सगळेच आदर्शवत होते. पण त्याच गांधींचे ते गेल्यानंतर या देशात काय झाले?

‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटात त्याच्या काही खुणा दिसतात. यातला नायक उत्तम चौधरी (अनुपम खेर) डिमेंशिया – स्मृतिभंश रोगाचा शिकार आहे. त्यामुळे स्मरण विस्मरणाच्या गर्तेत तो हिंदकळत असतो. वर्तमान काळ आणि भूतकाळ यात त्याची गल्लत होत असते. एकदा वर्तमानपत्रातील गांधीजींच्या फोटोवर एकजण चहाचा कप ठेवताना तो पाहतो. ते पाहून त्याच्या मनाचे संतुलन बिघडते. त्याला वाटू लागते आपणच गांधीजींचा खून केलेला आहे.

त्या पुढचा प्रवास उत्तम चौधरीचा तर दिसतोच, पण आजची पिढी वर्तमानात गांधी विचारांचे अवमूल्यन कसे करते हे दिसत जाते. तेव्हा एक संवाद आहे, “तुम्हाला माझी आठवण फक्त दोनच दिवशी येते, 2 ऑक्टोबरला आणि 30 जानेवारीला.गांधी जयंतीला आणि पुण्यतिथीला…’’ अर्थात उद्वेगाने आलेला हा विचार आहे.

त्याच वेळी हेदेखील तितकेच खरे की, ‘व्यक्ती गांधी’पेक्षाही ‘गांधी विचार’ टिकून राहणार आहे. कारण त्यामागे सामान्य माणसाचा विचार केलेला आहे. त्यामुळेच गांधीजींना ‘शाश्वताचा सारथी’ म्हटले गेले ते सार्थच आहे. गांधींचे सारे आयुष्य म्हणजे अथांग समुद्र आहे. त्यात शोधावे तेवढे कमीच.

दक्षिण आफ्रिकेतील अनुभवांनी त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. म्हणूनच तर आपल्याला हा जगावेगळा माणूस लाभला. याबाबत पुढे नेल्सन मंडेला यांनी म्हटलेही, ‘भारताने दक्षिण आफ्रिकेत वकील असणाऱ्या गांधीजींना पाठवले आणि दक्षिण आफ्रिकेने भारतात महात्मा गांधी पाठवून परतफेड केली.’ तेथून परतताना त्यांनी बरोबर काय मौल्यवान गोष्टी आणल्या असतील? … दहा हजार पुस्तके!

पुढे इंग्लंडमध्ये गांधीजींनी आपल्या सगळ्या इंग्रजी पेहरावाला राम राम केला. पण एक गोष्ट मात्र आयुष्यभर त्यांनी जपली ती म्हणजे त्यांच्या कमरेला लटकलेले घड्याळ, झेनिथ कंपनीचे घड्याळ. त्याबाबत त्यांनी म्हटलेही होते की, मी फक्त एकाच हुकूमशहाचा आदेश पाळतो, तो म्हणजे घड्याळ!

या त्यांच्या घड्याळाबद्दल पु. ल. देशपांडे यांनी स्वतंत्र लेखच लिहिलेला आहे. तो आवर्जून वाचायला हवा. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात एकच हिंदी चित्रपट बघितला तो म्हणजे ‘रामराज्य.’ तो कुठल्या थिएटरमध्ये होता असे मी एकदा या चित्रपटात सीतेची भूमिका करणाऱ्या शोभना समर्थ यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी ‘रामराज्य’ लागलेल्या कुठल्या तरी थिएटरचे नाव घेतले. पण ते तसे नव्हते. जुहूच्या एका बंगल्यात गांधीजींसाठी स्पेशल स्क्रीनिंग केले गेले होते.

पण याचा अर्थ गांधीजी कुठल्या थिएटरमध्ये गेलेच नाहीत का? चित्रपट अभ्यासक अरुण पुराणिक आणि यांनी ‘मुंबई मेन सिनेमा’ असे मुंबईतील चित्रपटगृहांची माहिती देणारे चांगले पुस्तक लिहिले आहे. त्यातदेखील नाही. हे वाचताना एकदम आठवले, गांधीजींनी चक्क हिंदू महासभेच्या एका राष्ट्रीय अधिवेशनात भाषण केले होते. ते अधिवेशन ग्लोब थिएटरमधे भरले होते. यावर अधिक प्रकाश टाकायला हवा.

पण हे ग्लोब थिएटर मुंबईत कुठे आले? आता हे परत अरुण पुराणिक यांनाच विचारले. तत्क्षणी ते म्हणाले, “या ग्लोब थिएटरात मूक चित्रपट दाखवत असत. पुढे बोलपट सुरू झाल्यानंतर त्याचे नाव कमल झाले आणि पुढे त्याचे अलंकार म्हणून नामांतर झाले.’ गांधीजींबद्दल बोलताना असे अनेक वेड्यावाकड्या वळणांनी आठवत जाते. गांधीजी स्वेच्छेने शाकाहारी बनले. त्याला कारणीभूत झाले हेन्री सॉल्ट या लेखकाचे पुस्तक ‘प्ली फॉर व्हेजेटेरीयनिझम.’ (शाकाहारासाठी आवाहन).

थोरामोठ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे वेड जगभर दिसते. मात्र गांधीजींची पाच रुपये दिले तरच स्वाक्षरी देईन अशी अट असे. हेन्री फोर्डला त्यानी चरख्यावर स्वाक्षरी करून तो भेट दिला होता. अर्थात फोर्डने किती पैसे दिले याची नोंद नाही. अर्थात फोर्डला त्यांनी सुखासुखी सोडला नसणारच, कारण शेवटी ते गांधी म्हणजे बनिया होते!

पण याच गांधींनी चार्ली चॅप्लिनची स्वाक्षरी घेतली होती. अर्थात आपल्यासाठी ती घेऊन यावी असे तेव्हा लहान असणाऱ्या इंदिरा नेहरूंनी त्यांना सांगितले होते म्हणून गांधी पुण्यतिथीला असेही त्यांचे स्मरण चालेल नाही का?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक
चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या एक दहावीचा विद्यार्थी...
Mahakumbh 2025 – ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मत
उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव, मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, दहा किमी परिसरात हाय अलर्ट
OnePlus चा ‘हा’ टॅब पहिल्यांदाच मिळत आहे 19,749 रुपयांमध्ये, किंमत आहे 40 हजार; जाणून घ्या काय आहे ऑफर
Hero Xpulse 210 ची बुकिंग आणि डिलिव्हरी कधी होणार सुरू? किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Australian Open 2025 – यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले, अंतिम फेरीत झ्वेरेवचा केला पराभव
जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार? गनिमी कावा करणार; भरतशेठ गोगावले यांचं मोठं विधान