मंथन – `ट्रम्प 2.0′ आणि अमेरिका
>> डॉ. वि. ल. धारुरकर
गलितगात्र झालेल्या अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनविण्याचे अभिवचन देऊन लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेले डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये प्रविष्ट झाले. त्यांचे अभिभाषण त्यांचा उत्साह आणि उदंड आत्मविश्वासाचे प्रतिबिंब म्हणावे लागेल. कडाक्याच्या थंडीत त्यांनी कॅपिटल इमारतीच्या आतील सभागृहात मिळविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, एकानंतर एक टाळ्यांचा कडकडाट आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे गाजले. आशा-आकांक्षा आणि नव्या घोषणा तसेच अमेरिकेसमोर असलेल्या नव्या आव्हानांचा त्यांनी घेतलेला धांडोळा अद्भुत आणि वैशिष्ट्यपूर्ण असा होता.
राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभिभाषणाकडे पाहता असे दिसते की, `अमेरिकेचे सुवर्णयुग आणि समृद्धीच्या नवपर्वाची नांदी’ या टॅगलाइनवर आधारित त्यांचे भाषण हे त्यांनी पहिल्या अध्यक्षीय काळात आणि निवडणूक प्रचार मोहिमेत पेलेल्या भाषणांचा सार किंवा विस्तार म्हणावा लागेल, पण आता त्यांच्यापुढे केवळ आश्वासने नव्हेत, तर कृती करावयाची असल्यामुळे त्यांनी प्रस्तुत केलेले कार्पाम काहीसे सुनिश्चित, काहीसे अनिश्चित असे संमिश्रतेने भरलेले दिसून येतात. खुमासदार शैलीतील त्यांचे मार्मिक निवेदन आणि त्यातील चौकार व षटकार यामुळे त्यांनी अमेरिकन जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. विरोधकांवर ओरखडे, मार्मिक टीकाटिपणी आणि आपल्या अनुयायांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यात ट्रम्प यांना निश्चितपणे यश आले. लोकप्रियतेच्या लाटेवर ट्रम्प सध्या आरूढ आहेत, पण ते आता किती यशस्वी होतात ते त्यांच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामगिरीवरून दिसून येईल. बॉर्डन यांच्या मते, एखाद्या नेत्याची पहिल्या 100 दिवसांतील कामगिरी ही त्याचे भावी दिग्दर्शन घडविते. सुनिश्चित ध्येयवाद कार्पाम आणि नियोजन यावर 100 दिवसांची मोहीम अवलंबून असते. यादृष्टीने विचार करता कल्पकता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा तसेच भावी यशाचे नियोजन यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
स्थलांतरितांच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेली ठोस भूमिका तसेच अमेरिकेतील ऊर्जा, आणीबाणी आणि त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दिलेले अभिवचन या तीन बाबी प्राधान्याने महत्त्वाच्या म्हणता येतील. युद्ध आणि अशांतता नव्हे, शांतता आणि सुव्यवस्था हाच प्रगतीचा मार्ग आहे हे सूत्र घेऊन त्यांनी हमास-इस्रायल युद्ध, पोन युद्ध थांबविण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्याला अनुसरून त्यांनी आपल्या भाषणात आपल्या नव्या प्रमेयाची मांडणी केली. अमेरिकेचे सामर्थ्य महत्त्वाचे आहे. ते जपण्याचा प्रयत्न करणार, आम्ही अमेरिकेचे हित प्रथम जपणार हे अभिवचन त्यांनी दिले. शिवाय आपल्या आयात शुल्क धोरणाचाही पुनरुच्चार केला आणि मेक्सिकोच्या आखाताला `अमेरिकी आखात’ असे नाव दिले. पनामावर चीनचे प्रभुत्व कशाला? तो तर अमेरिकेने मुक्त केलेला प्रदेश आहे. तो अमेरिकेचाच आहे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली. पश्चिम गोलार्धात असो, आशिया आणि आफ्रिकेत असो, अमेरिकेचे प्रभुत्व वाढविण्याचा आणि संपन्न राष्ट्र बनविण्याचा विश्वास त्यांनी प्रकट केला. तसेच अंतराळ संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमध्येसुद्धा आपल्या प्राधान्पामावर त्यांनी विशेष भर दिला. शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेत पुनर्रचनेचे आश्वासन दिले. `ड्रील बेबी ड्रील’ हा त्यांचा खास शैलीतील दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला.
ट्रम्प यांच्या भाषणाचे सार कशात असेल, तर अमेरिकेचे गेलेले वैभव परत मिळवून देण्यात आहे. अमेरिका आपले वर्चस्व गमावून बसली होती. पश्चिम गोलार्धात काय किंवा जगाच्या इतर भागातील देशात काय, अमेरिकेचे प्रभुत्व हरवले होते. ते पुन्हा मिळवून देण्याचा ट्रम्प यांचा संकल्प आहे, पण हा मार्ग सोपा नाही. त्यांच्या मार्गात देशात आणि देशाबाहेर दोन्हीकडे अडचणी आहेत. देशामध्ये कडव्या डाव्यांचे आव्हान आहे, तर बाहेर चीन व रशियाचे आव्हान आहे. या परिस्थितीत ट्रम्प आपल्या उदंड आत्मविश्वासाने आणि एलॉन मस्कसारख्या समर्थकाने अंतर्गत व बाह्य शत्रूवर कसा विजय मिळवितात ते आता पाहावयाचे आहे.
खरे तर असे म्हणतात की, प्रशासनात समीपच्या लोकांचे संकट अधिक असते. मस्क हे जसे त्यांचे बलस्थान म्हणून कामास आले तसे ते त्यांचे संकटही ठरू शकते. त्यामुळे ट्रम्प यांना भविष्यात समर्थ वाटचाल करताना अंतर्गत व बाह्य शत्रूपासून सावध राहणे आवश्यक आहे. चीनवर आणि शेजारील देशांवर टॅरिफ लावण्याचा त्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यातून कोणते प्रश्न उभे राहतील? त्या प्रश्नांना सामोरे जाताना काय करावे लागेल? हे येणारा काळ सांगेल. अंतराळ संशोधन असो, आर्थिक सेवा व उत्पादने असोत किंवा संशोधन आणि विकासाची क्षेत्रे असोत, अमेरिकेला याबाबतीत अनेक नव्या गणितांची, नव्या प्रमेयांची मांडणी करावी लागणार आहे. अमेरिकेचे जनमानस ट्रम्प यांनी ओळखले. लोकांची नाडीही ओळखली, पण आता यशापयशाच्या हिंदोळ्यावरती ऊनसावल्यांचा खेळ त्यांच्या बरोबर आहे. अशा वेळी 78 वर्षांचे तरुण डोनाल्ड ट्रम्प निर्णय कसे घेतात, अमलात कसे आणतात आणि इतिहासाची पाने कशी बदलतात यावरूनच त्यांच्या सुवर्णयुगाची प्रचीती येणार आहे.
1776 मध्ये अमेरिका स्वतंत्र झाल्यापासून 2025 पर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षांची वाटचाल पाहिली तर अंतर्गत धोरणाप्रमाणेच त्यांचे परराष्ट्र धोरणही तेवढेच महत्त्वाचे असते. बायडेन यांच्या कार्यकाळात त्यांच्या परराष्ट्र धोरणाची समीकरणे चुकली आणि त्याचा थेट फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 च्या निवडणुकीत झाला. खुद्द डेपॉटिक पक्षाचे धोरण युद्धाऐवजी शांतता असे पूर्वी होते, परंतु बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात ठिकठिकाणी हस्तक्षेप करून युद्धे वाढविण्याचा आणि अधिक भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या वाटय़ाला अप्रियता आली. याउलट, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जगात शांतता आणि सुव्यवस्था आणण्याचे अभिवचन दिले. आपण सत्ता हाती घेतल्यानंतर लगेच हमास-इस्रायल युद्ध थांबवू आणि पोन युद्ध चोवीस तासांत बंद करू असे वचन त्यांनी दिले होते. त्यातील आखातातील युद्ध सध्या थांबल्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खुद्द अमेरिकेतील जनताही आता युद्धाला फार कंटाळली आहे. कारण युद्धामध्ये अमेरिकेचा प्रचंड खर्च झाला आहे. शिवाय तेवढीच बदनामीही अमेरिकेच्या पदरी आली आहे. त्यामुळे आता अमेरिकेला विकासकेंद्री राजकारणाकडे नेण्याचा ट्रम्प यांचा संकल्प आहे; परंतु रशिया-पोन, हमास-इस्रायल संघर्ष थांबवताना ते कॅनडाचे एकीकरण, पनामा कालव्यावर सार्वभौमत्व मिळवणे, ग्रीनलँडची खरेदी या तीन निर्णयांच्या माध्यमातून नव्या संघर्षाला फोडणी देताहेत.
1901 पासून ते 2024 पर्यंत अमेरिकेचे काही अध्यक्ष मोन्रो मन्रो सिद्धांतानुसार पश्चिम गोलार्धात अमेरिकेची प्रभुसत्ता गाजविणारे होते. `अमेरिका फॉर अमेरिकन्स’ या मन्रो सिद्धांतानुसार पश्चिम गोलार्धात कोणीही हस्तक्षेप केल्यास अमेरिका त्यांना चोख उत्तर देईल असे वर्तन होते. इतर अनेक अध्यक्षांनी युरोप आणि आशियातसुद्धा अमेरिकेचे प्रभुत्व कायम ठेवले, परंतु बायडेन यांच्या काळात त्यांना खुद्द पश्चिम गोलार्धातही अमेरिकेचा दबदबा ठेवता आला नाही. शिवाय पश्चिम आशिया आणि रशियामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी नाटो राष्ट्रांना चुचकारले, परंतु सर्वसाधारणपणे युरोपीय देशांवर या युद्धाचे मोठे प्रतिकूल परिणाम झाले. त्याची आर्थिक झळ युरोपीय देशांना एवढी बसली की, ते सारे देश महागाईच्या आणि अस्थिरतेच्या खाईत लोटले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा अंतर्गत समृद्धी आणि आाढमक परराष्ट्र धोरण यामुळे अमेरिकेला महासत्ता म्हणून यशोशिखरावर ठेवण्याबाबतचा विचार महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांना आपल्या परराष्ट्र धोरणाची गणिते मांडताना तीन गोष्टींवर भर द्यावयाचा आहे. पहिली बाब म्हणजे त्यांना अमेरिकेला पश्चिम गोलार्धात अधिक स्थिर करावयाचे आहे. ते जरी कॅनडाला 51 वे घटक राज्य म्हणत असले तरीदेखील प्रत्यक्षात तसे करतील असे वाटत नाही. त्यांचा प्रयत्न एवढाच आहे की, कॅनडाच्या नेत्यांनी अमेरिकेच्या शब्दापलीकडे जाऊ नये आणि ट्रुडो यांनी जसे आव्यापारेशु व्यापार किंवा नसत्या उठाठेवी केल्या तशा उठाठेवी करून कॅनडामध्ये अस्थिरता निर्माण केल्यास त्याचे कळत-नकळत परिणाम अमेरिकेवरही होतात हे कॅनडातील नेत्यांना कळले पाहिजे एवढाच ट्रम्प यांना कॅनडास धमकावण्याचा हेतू आहे. दुसरे म्हणजे त्यांनी मेक्सिकोलासुद्धा दणका दिला आहे. त्याचे उत्तर कसेबसे मेक्सिकोचे नेते देत आहेत, परंतु स्थलांतराचा प्रश्न आणि मेक्सिकोच्या उठाठेवी याही फार समर्थनीय नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांना स्थलांतर करणाऱ्या आणि अमेरिकेवर अकारण ओझे वाढविणाऱ्या समस्या नको आहेत. त्यासाठी ते जेवढे कोणी घुसखोर असतील त्यांना अमेरिकेच्या भूमीतून दूर करण्याचा प्रयत्न करतील. तिसरे म्हणजे ट्रम्प यांना आपल्या परराष्ट्र धोरणातील सिद्धांताच्या आधारे काही बदल दाखवावयाचा आहे. बायडेन जेथे चुकले तेथे आपण कसे दुरुस्त केले हे दाखविण्यावर त्यांचा भर असणार आहे. त्यामुळे उडदामाजी काळे गोरे, असा विचार केल्यास आपण बायडेन धोरणापेक्षा कसे गोरे आहोत हे दाखविण्यावर ट्रम्प यांचा भर असेल.
एकूणच, आपण बायडेन यांच्यापेक्षा उजवे, हितवर्धक आणि युगप्रवर्तक परराष्ट्र धोरण अमेरिकेला देत आहोत हे सिद्ध करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असणार आहे. त्याअनुषंगाने ते पुढील तीन बाबींवर भर देतील. पहिली गोष्ट म्हणजे युरोपात हस्तक्षेप करताना ते नाटोच्या घोडय़ावर बसून अमेरिकेचे प्रभुत्व गाजविणार नाहीत. त्याऐवजी युरोपातील राष्ट्रांमध्ये चांगला, वाईट असा फरक करून गुणात्मक दृष्टीने युरोपीय देशांशी संबंध ठेवतील. मेलोनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर खूश आहेत. जर्मनीतील नेते त्यांच्याशी संबंध ठेवताना चाचपून पाहत आहेत. पोन युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांच्या कोणकोणत्या योजना आहेत, कोणती धोरणे आहेत याचा रशिया बारकाईने अभ्यास करीत आहे आणि या अभ्यासानंतरच आम्ही साद-प्रतिसाद किती द्यावयाचा ते ठरवू असे रशियन नेते म्हणत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मध्य आशियातला संघर्ष थांबल्यानंतर ते नव्या समीकरणांना आकार देताना दिसतील.
बायडेन यांच्या काळात अमेरिकेच्या पुंडाईला कंटाळून ब्रिक्ससारखे संघटन पुढे आले. ब्रिक्सने थेट अमेरिकन डॉलरला आव्हान दिले आणि ब्रिक्स बँक निर्माण केली. शिवाय दक्षिण आशियातील राष्ट्रेसुद्धा जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जवसुली पद्धतीला कंटाळली आहेत व त्यांनी दक्षिण आशियाचा आवाज बुलंद केला आहे. आशियाप्रमाणेच आफ्रिकेतील देशसुद्धा चीनच्या शोषणाला आणि विस्तारवादाला कंटाळले आहेत. अशा वेळी अमेरिकेने केवळ `आम्हाला पहा आणि फुले वाहा’ असे धोरण घेऊन चालणार नाही, तर आफ्रिका खंडातील 60 देशांच्या प्रगतीसाठी अमेरिकेला थोडा पैसा सोडावा लागेल. निधी द्यावा लागेल. प्रे. हेन्री ट्रुमन यांनी ज्या पद्धतीने साम्यवादाला विरोध करण्यासाठी मार्शल योजना आणली होती तशी एखादी `मस्क योजना’ ट्रम्प आणतील काय? त्यामुळे आफ्रिका खंडातील व आशिया खंडातील चिनी ड्रगनच्या विस्तारवादाला लगाम बसेल काय? हाही एक मोठा प्रश्न आहे. चीनच्या विस्तारवादाला वेसण घालण्यासाठी ट्रम्प यांचे धोरण उपयोगी पडेल. या धोरणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा भारतालाही होऊ शकेल ही गोष्ट महत्त्वाची आहे. ते शी जिनपिंग यांच्याशी मैत्री करण्याचे गोडीगुलाबीचे धोरण वरून आखत असले तरी आतून त्यांना चीनचे पंख छाटावयाचे आहेत व तसे पंख छाटण्यात मुत्सद्देगिरीपणे ते किती यशस्वी होतात यावरच त्यांचे भावी प्राबल्य अवलंबून असणार आहे. भारतासाठी तूर्त ट्रम्प यांचा अमेरिकन नागरिकत्वाचा निर्णय धक्कादायक दिसत असला तरी यावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडलेली असून मस्क या निर्णयाच्या विरोधात आहेत. तसेच या निर्णयाला न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ दबावासाठीचे हत्यार म्हणून ट्रम्प वापरतील असे दिसते.
लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्}sषक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List