‘खो-खो’ खेळातही करिअरच्या संधी !
‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास करिअरच्या संधी नसल्यामुळे पालक खो-खो खेळाबाबत नकारात्मक होते. मात्र, मायदेशात पहिला खो-खो विश्वचषक झाला अन् महिला व पुरुष या दोन्ही गटांमध्ये हिंदुस्थान जगज्जेता ठरल्याने या खेळाबद्दल देशात आता सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मोठी पारितोषिक रक्कम जाहीर झाली. खेळाडूंना नोकऱ्याही उपलब्ध होत आहेत. करिअरच्या या संधींमुळेच ‘खो-खो’ला सोनेरी भविष्य आहे,’ अशा भावना हिंदुस्थानी खो-खो महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर यांनी व्यक्त केल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विश्वविजेत्या हिंदुस्थानी खो-खो संघातील खेळाडूंचा शनिवारी (दि. 25) गौरव करण्यात आला. पुरुष व महिला संघातील खेळाडू प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, रामजी कश्यप, आदित्य गणपुले, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. अमीर रव्हाटे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजित जाधव, सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप तावडे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी सर्वांचा सन्मान केला. संघाचे उपाध्यक्ष श्रीकिशन काळे यांनी सूत्रसंचालन केले.
खो-खो या खेळाचा आशियाई व ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता 55 देश खो-खो खेळत आहेत. भविष्यात 90 ते 100 देश हा खेळ खेळतील. भविष्यात एखादा परदेशी संघ जेव्हा हिंदुस्थानला हरवेल, तेव्हा खऱ्या अर्थाने या खेळाचा प्रसार झाला असे म्हणता येईल.
शिरीन गोडबोले, प्रशिक्षक
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List