संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील व्हिडीओ समोर, सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आकाचा..
बीड जिल्ह्यातल्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, आतापर्यंत या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. दरम्यान वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणी मागितल्याचा देखील आरोप आहे.
या संदर्भातील एक व्हिडीओ आता समोर आला आहे, या व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहेत, त्यांच्यासोबत काही पोलीस अधिकारी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
मी जे आरोप केले त्याचे पुरावे एसआयटीनं पुढे आणले आहेत, आकाचा संबंधही आहे हे स्पष्ट होतं आहे. अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि मारत आणलं होतं. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. या व्हिडीओमध्ये आका, चाटे, घुले असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता पीआय पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे. महाजन यांना बडतर्फ केलं पाहिजे. गर्जेंनाही बडतर्फ करा किंवा गडचिरोलीला पाठवा. तो मी नव्हेच म्हणणारा, हा मीच आहे असं म्हणताना तुम्हाला दिसेल. मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली आहे.अजून बरेच आरोपी आहेत, त्यांचा बंदोबस्त व्हावा अशी आमची मागणी आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय
खंडणी प्रकरणातला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काही पोलीस अधिकारी देखील दिसत आहेत. या व्हिडीओनं खळबळ उडाली असून, वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List