मोठी बातमी! केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली! मनसे नेत्यांचा बैठकीत सूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील मोठी बातमी समोर येत आहे. मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिस्कटली. मनसेच्या मुंबईतील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील, असे संकेत मिळत होते. पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही. मनसेला जी जागा लोकसभेत हवी होती त्या जागेवर शिवसेना दावा करत होती. तसेच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढवावं लागेल, अशी शिवसेनेची भूमिका होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकवला. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही. याचबाबत आजच्या मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांना दिले. विधानसभेत जे झालं ते विसरा, आता पालिकेच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. विशेष म्हणजे आगामी पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. निवडणुकीत मनसेची वाटचाल, इतर पक्षांसोबतच्या युतीबाबत राजकीय आढावा घेणाऱ्या टीमचं मत लक्षात घेतलं जाणार. मनसेकडून आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज जवळपास दीड तास बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका हाच महत्त्वाचा मुद्दा होता. या महापालिका निवडणुकीत मनसे कुणासोबत युती करणार? याबाबत चर्चा झाली. मनसेच्या नेत्यांची एक कमिटी तयार केली जाईल आणि युती करायच्या वेळी या किमिटीतील नेत्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं जाईल. त्याचसोबत विधानसभेत आणि लोकसभेत काय चुका झाल्या, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. अनेक विभागाध्यक्षांचं म्हणणं होतं की, एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली होती त्यामुळे आपण महायुतीत सामील झालो नाहीत.
एकनाथ शिंदे यांच्या नकारघंटेमुळे मनसे महायुतीत गेली नाही, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये कुणासोबत जायचं, याबाबत बैठकीत चर्चा झाली. येत्या काळात लवकरात लवकर बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत आगामी काळात कोणती ध्येय धोरणे घेऊन महापालिका निवडणुकीला सामोरं जावं, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List