रात्री औषध घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाहीत..; ‘हिरवं कुंकू’ फेम योगेश महाजन यांचं निधन
मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती चाहत्यांना दिली. ‘अत्यंत दु:खद अंत:करणाने हे सांगतोय की आमचे आवडते योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन झालं. 19 जानेवारी 2025 रोजी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालंय. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी हा खूप मोठा धक्का आहे. सोमवारी 20 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, अशी माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे देण्यात आली. योगेश महाजन यांच्या पार्थिवावर मुंबईतील बोरिवली इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
योगेश महाजन यांनी अनेक मराठी चित्रपट आणि काही हिंदी पौराणिक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी ते उमरगावला गेले होते. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्य यांची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी जेव्हा मालिकेचं शूटिंग संपलं, तेव्हा योगेश यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतलं आणि रात्री ते हॉटेलच्या रुममध्या झोपायला गेले. मात्र रविवारी सकाळी ते शूटिंगसाठी सेटवर आलेच नव्हते.
योगेश सेटवर न आल्याने मालिकेच्या टीममधील सदस्यांनी काळजी व्यक्त केली. त्यांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेश यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जेव्हा त्यांच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा ते बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. तोपर्यंत कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं.
जळगावमध्ये राहणाऱ्या योगेश यांचा जन्म सप्टेंबर 1976 मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला होता. अभिनयक्षेत्रात कोणताही गॉडफादर नसतानाही त्यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम केलंय. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यापूर्वी ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘मुंबईचे शहाणे’, ‘समसारची माया’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List