तर सैफचा हल्लेखोर कधीच सापडला नसता? हल्ल्यानंतरचा शहजादचा सर्वात मोठा प्लान उघड
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अखेर पकडला आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील जंगलातील झुडूपांमध्ये तो लपला होता. अंगावर झाडाच्या फांद्या आणि पाला ओढून तो लपला होता. पण पोलिसांना टिप मिळताच मध्यरात्री कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा बांगलादेशचा आहे. मुंबईत आल्यावर त्याने त्याचं नाव विजय दास असं ठेवलं होतं. सैफवर हल्ला केल्यानंतरचा त्याचा मोठा प्लानही उघड झाला आहे.
सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर शरीफुल इस्लाम शहजाद हा लपत फिरत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. टीव्हीवर त्याचे फोटो दाखवले जात होते. त्यामुळे टीव्ही पाहून आरोपी सतत लोकेशन्स बदल होता, अशी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यावर तो घाबरला होता. त्याने ज्या घरात चोरी केली ते सैफ अली खानचं घर आहे हे त्याला माहीत नव्हतं. जेव्हा त्याला सैफ अली खानवर आपण हल्ला केला याची माहिती मिळाली त्यावेळी तो अधिकच घाबरला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
मुकादमाने हटकलं अन्…
टीव्हीवर त्याचे फोटो झळकल्याने एका मुकादमाने त्याला हटकले होते. त्याला पोलीस शोध आहेत. पोलिसांसमोर शरणागती पत्कर असं या मुकादमाने त्याला सांगितलं होतं. त्यामुळे तो अधिकच मानसिक तणावात आला होता. त्यामुळे त्याने बांगलादेशात परत पळून जाण्याचा प्लान आखला होता. त्यासाठी त्याने अनेकांना संपर्कही साधला होता. जोपर्यंत बांगलादेशात जाण्याचं ठरत नाही, तोपर्यंत लपून राहण्याचा त्याचा इरादा होता. पण पोलिसांना त्याची टीप लागली आणि तो बांगलादेशला पळून जाण्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. त्यामुळे त्याचा बांगलादेशात जाण्याचा प्लान फसला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा बांगलादेशात पळून जाण्याचा प्लान यशस्वी झाला असता तर तो कधीच हाती लागला नसता, असंही सांगितलं जात आहे.
वैद्यकीय तपासणी होणार
दरम्यान, पोलिसांनी आता शहजादला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूलही केला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला हॉलिडे कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे शहजादला किती दिवसाची कोठडी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. आज सकाळीच सैफची आई शर्मिला टागोर, त्याची बहीण सोहा, सोहाचा नवरा कुणाल खेमू हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी सैफच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशीही संवाद साधला. सैफ अली खानला आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List