‘जय जय स्वामी समर्थ’च्या प्रेक्षकांना चांदीच्या स्वामी पादुका जिंकण्याची सुवर्णसंधी
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत भक्तांना अनेक स्वामी लीला, चमत्कार बघायला मिळाले आणि ज्यानं त्यांना समृद्ध केलं. स्वामींनी नेहमीच भक्तांना आपलंसं केलं, सत्कर्म करायला शिकवलं. स्वामींच्या छत्रछायेखाली आलेला प्रत्येक नास्तिक आस्तिक बनला. त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. याच शृंखलेत आता अजून एक अध्याय जोडला जाणार आहे. तो म्हणजे मालिकेत सुरू होतोय अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय. “अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही, आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही,” या स्वामींच्या शब्दांना उजाळा मिळणार आहे. अध्यात्मिक शक्ती, भक्ती, आणि मानवी जीवनातील चमत्कारांचा प्रवास उलगडणाऱ्या अलौकिक चरणपादुका लीला या विशेष अध्यायाची सुरुवात होत आहे. या कथा स्वामींच्या चरणपादुकांच्या महतीचे, त्यांच्या चमत्कारांचे, आणि त्यांच्या साक्षात्कारांचे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.
या अध्यायाची सुरुवात आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीने होत आहे. स्वामी देवकीच्या कुटुंबाला चरणपादुका देतात आणि एक प्रतिकात्मक मुखवटाही देतात. देवकी आणि यमुनाच्या वैचारिक प्रवासात प्रेक्षकांना श्रद्धा आणि संशय यामधील संघर्ष अनुभवता येईल. ही कथा खूपच रोमांचक, गूढ आणि भावनिक आहे. जी विश्वास, श्रद्धा आणि कर्म यांच्यातील द्वंद्व आणि अध्यात्मिक लीला उलगडते, श्रद्धेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते आणि मानवी जीवनातील समस्यांवर असलेल्या समाधानांचा शोध लावते.
सरदेशमुख दाम्पत्य स्वामींच्या चरणपादुकांची प्रतिष्ठापना त्यांच्या वाड्यात करतील का? स्वामींच्या आशीर्वादाने, देवकी ज्या बाळंतपणात जीवघेण्या परिस्थितीत असते, त्यातून ती कशी बाहेर पडते? स्वामींच्या पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने काळी सावली कशी हटवली जाते आणि देवकीला कसा पुत्रसुख प्राप्त होतो, याचा उलगडा मालिकेत होणार आहे. यामध्येच कपिलाचं षड्यंत्र सुरु आहे. ज्यामध्ये कपिलामाई स्वामींच्या पादुकांचा गैरवापर करत असते. तिच्या दुष्कृत्यांमुळे जनाबा नावाच्या भक्ताला संकटांना सामोरं जावं लागतं. कपिलामाईचे हे दुष्कृत्य स्वामी कसे उघडकीस आणणार? स्वामी कसा न्यायनिवाडा करणार, याबद्दलची कथा प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल.
यानिमित्त कलर्स मराठी या वाहिनीने ‘स्वामी पादुका महाकॉन्टेस्ट’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आता साक्षात स्वामी पादुका तुमच्या घरी येणार आहेत. 2 ते 30 जानेवारीदरम्यान ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत दर आठवड्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना चांदीच्या स्वामी पादुका मिळणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List