वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या सालगड्याचा धक्कादायक खुलासा, खळबळजनक आरोप
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्याच्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात फसला आहे. दरम्यान हे सर्व सुरू असताना आता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्यानं गंभीर आरोप केला आहे.
वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने हे कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात काम करतं, मात्र या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीच न मिळाल्याचा आरोप शिंदे माने कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
गेल्या सात महिन्यापासून हे कुटुंब वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या शेतात काम करते. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नसल्याचा दावा या कुटुंबानं केला आहे. त्यामुळे आता या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर आपली भूक भागवत आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं एक ट्विट केलं होतं. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याच क्षेत्रफळ साधारण 36 एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे. दोन वर्षात कालावधीत या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List