Ladki Bahin Yojana : ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही, आदिती तटकरे यांच्याकडून मोठा दिलासा; तुम्ही आहात का त्यात ?
अधिक उत्पन्न, गडगंज संपत्ती, वाहने असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची जोरदार छाननी सुरू आहे. या महिलांनी परिस्थिती चांगली असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे या महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. या महिलांना योजनेतून बाद केलं जाणार आहे. काही लाभार्थी बहिणीं तर सरकारी तिजोरीत पैसे जमा केले आहेत. सरकारने मोठं पाऊल उचलल्याने अनेकींचे धाबे दणाणले आहेत. या योजनेच्या अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. पण सर्वांच्याच अर्जांची छाननी होणार नाही. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आणि कोणत्या महिलांच्या अर्जाची होणार नाही, याची माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आम्ही परिवहन विभाग आणि आयकर विभागासोबत मिळून अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. महिला किंवा त्यांच्या नवऱ्याच्या नावावर वाहन तर नाही ना? यासाठी सरकार परिवहन विभागांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे. तर कोणत्या महिला किंवा त्यांचे पती कर भरतात? त्यांचं उत्पन्न काय याची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या मार्फत क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात आहे.
त्यांचं आधीच व्हेरिफिकेशन झालंय…
एकूण अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या सर्वांच्या अर्जांची छाननी होणार नाही. ज्यांनी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जोडले आहेत, त्यांच्या अर्जाचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही. पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या महिला दारिद्रय रेषेखाली येतात. त्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे. शिवाय अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना रेशन कार्ड देत असतो. त्यामुळे त्यांचं आधीच क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याचं गृहित धरून आम्ही पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करणार नाही, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
त्या महिलांना कळवू
क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये बाद झालेल्या महिलांकडून पैसे वसूल करणार का? असा सवाल आदिती तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर मात्र त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. आतापर्यंत साडे चार हजार महिलांनी स्वत:हून योजनेचा लाभ रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पैसे जमा केले आहेत. इतर महिलांनीही त्याचं अनुकरण करावं, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचं उत्पन्न अधिक आढळेल किंवा ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील त्यांना आम्ही तसं कळवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List