48 तास उलटले, सैफ अली खानवर हल्ला करणारा अद्याप पोलिसांना सापडेना, पडद्यामागे नक्की काय घडतंय?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी गुरुवारी हल्ला झाला. गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात घुसला. त्यावेळी त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने त्या चोराला पाहिले. यानंतर तिने आरडाओरड सुरु केली. यावेळी बेडरुममध्ये झोपलेला सैफ जागा झाला. त्याने त्या हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ आणि चोरामध्ये झटापट झाली. यात त्या चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला तसेच पाठीला गंभीर दुखापत झाली. यावेळी चोराने त्याच्यावर ६ वार केले. या गंभीर घटनेला तीन दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात व्यक्तीने आज गुरुवारी (16 जानेवारी 2025) चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली. त्यासोबतच चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. यानंतर तातडीने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पोलिसांकडून या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम आणि मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम कार्यरत आहेत.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आज तिसरा दिवस उजाडला आहे. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सैफ हा रुग्णालयात आहे. या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या मणक्यात अडकलेला चाकू शस्त्रक्रिया करून काढण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सैफला आयसीयू मधून बाहेर काढण्यात आले आहे. त्या सध्या एका स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आले आहे. डॉ नितीन डांगे हे त्याच्यावर उपचार करत आहेत.
हल्लेखोर चोर अजूनही फरार
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आज तिसरा दिवस उजाडला आहे. तरी अद्याप मुंबई पोलिसांना हल्लेखोर चोर सापडलेला नाही. सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपीसारखाच हुबेहुब दिसणारा एका संशयितला पोलिसांनी काल ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांच्या एका टीमने त्याची चौकशीही केली. मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. सैफवरील हल्ल्याला तीन दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे मुंबईतील कायदा सुव्यस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List