Saif Ali Khan Attacked: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा नवा CCTV समोर; तोंडावर कपडा बांधून..
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला कपडा बांधलेला एक व्यक्ती जिने चढून इमारतीत वर जाताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर एक बॅगसुद्धा आहे. रात्री 1 वाजून 37 मिनिटांनी हा आरोपीने सैफच्या इमारतीत सहाव्या मजल्यावरून वर जाताना पहायला मिळतोय. तर रात्री 2 वाजून 33 मिनिटांनी तो त्याच जिन्याने खाली उतरताना दिसला. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणतंच कापड बांधलेलं नव्हतं. तेच कापड त्याच्या एका खांद्यावर होतं. दरम्यान वांद्रे पोलिसांनी याच सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास या आरोपीने सैफच्या घरात प्रवेश केला होता. सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून तो घरात शिरला होता. त्यावेळी त्याला पाहून सैफच्या घरात काम करणारी एरियामा फिलिप्स उर्फ लिमा या सैफच्या मुलाला उचलण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ आणि करीना दोघंही तिथे पोहोचले. तेव्हा आरोपीने सैफवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफवर आरोपीने सहा वेळा वार केले आणि तिथून त्याने पळ काढला. त्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
लिलावती रुग्णालया सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या पाठीच्या मणक्याजवळ धारदार शस्त्राचा एक तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तो तुकडा बाहेर काढला. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून तो व्यवस्थित बोलत-चालत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची कायमस्वरुपी दुखापत किंवा पॅरालिसिसची शक्यताच नाही, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. सैफची रिकव्हरी पाहून आम्ही डिस्चार्जचा निर्णय घेऊ, असं लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री सैफची पत्नी करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. ‘आमच्या कुटुंबासाठी आजचा दिवस अत्यंत आव्हानात्मक होता. आम्ही अजूनही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना आम्ही मीडिया आणि पापाराझींना विनंती करतो की त्यांनी सतत कोणतेही अंदाज वर्तवू नयेत. तुम्ही दाखवलेल्या काळजी आणि पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत. मात्र सततची फेरतपासणी आणि दिलं जाणारं लक्ष यांमुळे केवळ आम्हाला त्रासच होणार नाही तर आमच्या सुरक्षेलाही धोका पोहोचू शकेल. आमच्या मर्यादांचा सन्मान करावा आणि आम्हाला थोडा वेळ द्यावा अशी मी विनंती करते’, असं तिने लिहिलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List